मुंबई - First Act docuseries : हिंदी मनोरंजन उद्योगातील बाल कलाकारांच्या प्रवासाची रंजक मांडणी करणारा 'फर्स्ट अॅक्ट' हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मलाकान मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली दीपा भाटिया यांनी याची निर्मिती केली आहे. अमोल गुप्ते याचे क्रिएटिव्ह निर्माता आहेत तर याचं दिग्दर्शन, लेखन दीपा भाटियांनी केलं आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असलेल्या वातावरणाची माहिती देऊन विचार करण्यास भाग पाडणारा हा माहितीपट या क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. या क्षेत्रात उत्तम काम करत असताना कुटुंबाची स्वप्ने आणि स्वत:च्या वैयक्तिक आकांक्षा यांच्यातील समतोल सांभाळताना अडथळ्यांचा सामना कसा करावा लागतो याचं चित्रण यात पाहायला मिळेल.
'फर्स्ट अॅक्ट' हा माहितीपट मुलांच्या कल्याणासाठी पालक आणि उद्योग दोघांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकेल आणि त्यांच्यासाठी सुरक्षित आणि संतुलित बालपण वाढवण्याच्या महत्त्वावर भर देईल.
ही मालिका सारिका, जुगल हंसराज, परझान दस्तूर आणि दर्शील सफारी यांसारख्या प्रतिभावान बनलेल्या आणि कधीकाळी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या कलाकारांनी सांगितलेले अनुभव आणि कथा यामध्ये सादर होतील. याशिवाय यात बालकलाकारांसोबत काम केलेल्या प्रख्यात चित्रपट निर्मात्यांचा दृष्टीकोनही पाहायला मिळेल. यामध्ये शूजित सरकार आणि अमोल गुप्ते, तसेच मुकेश छाबरा, हनी त्रेहान आणि टेस जोसेफ यांसारख्या कास्टिंग डायरेक्टर्स यांचे अनभव पाहायला मिळतील. त्यांचा या फिल्म इंडस्ट्रीत बालकलाकारांसोबत काम करतानाचा दृष्टीकोन समजून घेता येईल.
या माहितीपटाबद्दल बोलताना लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या दीपा भाटिया म्हणाल्या की, "हा एक असा प्रकल्प होता जो काही काळापासून माझ्या मनात होता. बाल कलाकार हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय कथानक प्रभावी होऊ शकले नसते, असं मला वाटतं. असं असलं तरी या कलाकारांना आव्हानांच्या अनोख्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. बाल कलाकार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात करणारे दिग्गज प्रतिभावंत या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत याचा मला खूप आनंद झाला आहे. मला वाटते की पालक, शिक्षक आणि चित्रपट निर्मात्यांनी हा माहितीपट पाहिला पाहिजे. त्यामुळे बाल कलाकारांसमोरील आव्हाने समजून घेणं सोपं होईल आणि ते आत्मविश्वासानं पाऊल टाकू शकतील. या बाल कलाकारांसाठी शक्य तितक्या चांगल्या गोष्टी करता येतील."