मुंबई - सध्या बरेच चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होत असले तरी ओटीटीवर सुद्धा मोठ्या संख्येने चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. काही चित्रपट तर खास डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी बनविले जातात. प्रेक्षकांचा ओढा ओटीटीकडे वळल्यापासून बरेच मोठे स्टार्स या प्लॅटफॉर्मचा रस्ता पकडू लागले आहेत. नुकताच ओटीटीवर चोर निकल के भागा नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय ज्यात यामी गौतम धर प्रमुख भूमिकेत आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी यामी गौतमसोबत संवाद साधला आणि तिची मते जाणून घेतली.
बरेच चित्रपट थिएटर ऐवजी ओटीटी वर प्रदर्शित होताहेत, याबद्दल तुझे काय मत आहे? - मला दोन्ही माध्यम आवडतात. काबील, विकी डोनर, बदलापूर, बाला, उरी असे माझे अनेक सिनेमे चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले आणि चांगले चालले. तसेच ओटीटी वर अ थर्सडे, दसवी, लॉस्ट सारख्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. आता नुकताच ओटीटी वर प्रदर्शित झालेल्या चोर निकल के भागा या चित्रपटलादेखील प्रेक्षक पाठिंबा मिळतोय याचा आनंद आहे. मी एक कलाकार आहे आणि माध्यम कुठलाही असलं तरी मी माझं काम चोख करते. चित्रपट ठराविक ठिकाणी प्रदर्शित होणार आहे म्हणून माझ्या परफॉर्मन्स मध्ये उतारचढाव बघायला मिळणार नाहीत. मी नेहमी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करीत असते.
परंतु चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वांनाच चित्रपट सिनेमागृहांतच प्रदर्शित व्हावा असे वाटत असते. मी स्वतः कम्युनिटी व्ह्यूविंग मध्ये खूष असते. अनेक प्रेक्षक एकाच वेळी हसतात, भावुक होतात, शिट्या-टाळ्या मारतात याची मजा काही और आहे. मला आठवते की आमचे वडील आम्हाला पिक्चर बघायला नेत असत, तेव्हा थिएटर मध्ये शिरताच गरमागरम पॉपकॉर्न चा वास अजूनही लक्षात आहे. लहान ठिकाणी प्रेक्षकसंख्या मोजून सामोसे, कोल्ड ड्रिंक च्या बाटल्या आणल्या जात असत. तसेच ओटीटी माध्यमावर कधीही कुठेही चित्रपट बघता येत असल्यामुळे अनेकांना ते सोयीचे वाटते. महत्वाचं म्हणजे निर्मात्याला काय हवंय. चित्रपट कुठे प्रदर्शित करावा याचा विशेषाधिकार त्याला आहे आणि आर्थिक गणितं सांभाळून तो निर्णय घेत असतो. माझ्यामते दोघांमध्ये बॅलन्स ठेवला तर दोन्ही माध्यमं एकत्र नांदू शकतील.