हैदराबाद- ईटीव्ही ग्रुपकडून बालभारत हे नवीन चॅनल आज लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण टीव्हीवर केवळ हिंदी आणि इंग्लिशमध्ये पाहिलेले कार्टून आता आपल्याला आपल्या मायबोलीत, म्हणजेच मराठीत पाहता येणार आहेत. हे चॅनल म्हणजे मराठी लहान मुलांसाठी एक विशेष भेट आहे! ईटीव्ही ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांच्या हस्ते या चॅनेलचे उद्घाटन पार पडले.
कार्टून पाहा आता मराठीत..
या चॅनलवर अॅनिमेटेड सीरीज, कार्टून प्रोग्राम आणि विविध रोमांचक सीरीअल्स पाहता येणार आहेत, तेही आपल्या मराठीत! गेल्या कित्येक दिवसांपासून या चॅनलच्या लाँचिंगची प्रतिक्षा करण्यात येत होती.
काही ओळखीची आणि काही नवीन पात्रं आपल्या भेटीला..
मोगली, किंगकाँग आणि पीटर पॅन या ओळखीच्या पात्रांसोबतच, मिली-जुली या बहिणींची आंबट-गोड मालिका; तसेच किटी, आणि अभिमन्यू ही नवीन पात्रंही तुमच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच अॅनिमल इमर्जन्सी, पॅकमॅन अशा नवीन मालिकाही या चॅनलवर पहायला मिळणार आहेत.