पुणे- सध्याची तरुणाई रॅप सारख्या गाण्यांना पसंती देत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. संगीताचे नवे ट्रेंड येतात आणि त्यातले काही कळो ना कळो, पण तरुणाई त्याच्याकडे आपसूक ओढली जाते. अशा काळात जगातील प्राचीन भाषेपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेमध्ये गाणी करायला पुण्यातील वृंद गंधर्व सख्यम या बँड पथकाने सुरुवात केलीय. विशेष बाब म्हणजे सध्या गाजत असलेली गाणीही या पथकाने संस्कृतमध्ये बनवली आहेत. या संगीत प्रकाराला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
अलिकडे 'पुष्पा' चित्रपटातील 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली' आणि 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाण्यांचं वेड पाहायला मिळालं होतं. अशा गाण्यांचीही निर्मिती 'वृंद गंधर्व सख्यम' या पथकानं संस्कृतमध्ये केली आहे. अशा प्रकारे संस्कृतमध्ये गाणी करणारं हे पुण्यातील पाहिलं बँड पथक आहे.
याबाबत वृंद गंधर्व सख्यम पथकाचे प्रांजल अक्कलकोटकर म्हणाले, 'मी आणि माझे सहकारी श्रीहरी गोखणकर यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ठरवलं होतं की आपण एक वाद्य वृंद तयार करायचा जो फक्त संस्कृतमध्ये गाण्यांची निर्मिती करेल. आमच्या लक्षात आलं की तरुण पिढी कोणत्याही भाषेतील गाण्यासाठी वेडी होते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही ठरवलं की या प्राचीन भाषेच्या संवर्धनासाठी संस्कृतमध्ये रोमँटिक गाणी बनवायची. त्यासाठी आम्ही वृंद गंधर्व सख्यमची निर्मिती केली आणि 2023 च्या गुढीपाडव्याला शुभारंभाचा कार्यक्रम केला.'
वृंद गंधर्व सख्यम या बँड पथकात विविध वयोगटातील जवळपास 15 ते 20 लोकांची टीम असून हे बँड पथक त्यांनी तयार केलेली आणि इतर लोकप्रिय गाणी संस्कृतमध्ये सादर करतात. मुंबई, नाशिक, पुणे अशा विविध शहरात आत्तापर्यंत या पथकाचे जवळपास 6 कार्यक्रम झाले असून त्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. स्वतः तयार केलेली जवळपास 15 गाणी या पथकाकडून सादर केली जातात. संस्कृतमध्ये विविध गाण्यांबरोबरच हिंदी तसेच विविध भाषेतील जवळपास 25 हून अधिक लोकप्रिया गाणी संस्कृमधून सादर केली जातात.