मुंबई - छोट्या पडद्यावरील मालिकाविश्व अनेकांच्या आयुष्यात महत्वाचे आहे. अनेक प्रेक्षक मालिकेतील रोज घडणाऱ्या गोष्टींचा उहापोह करतात किंवा संकटात सापडलेल्या मालिकेतील व्यक्तिरेखेला सल्ला देताना दिसतात. मनोरंजनसृष्टीतील सिरीयलबरोबर अनेकजण आपल्या आयुष्याची तुलना करीत असतात. त्यामुळेच मालिका निर्माते प्रत्येक मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट्स आणण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातच नवीन सिरियल्स प्रेक्षकांशी बांधिलकी बनविण्यासाठी मालिकेचे नाव आकर्षक ठेवतात. अनेक प्रसिद्ध कविता अथवा गाणी यातून मालिकेचे नाव ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आता हेच बघाना, स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरु होतेय ज्याचं नाव आहे, ‘मन धागा धागा जोडते नवा...’. यातून प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर, ‘मन धागा धागा जोडते नवा...’.प मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती या मालिकेत ‘आनंदी’ हे पात्र साकारताना दिसणार आहे. दिव्या पुगावकर एकदम नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिव्या पुगावकर म्हणाली, 'मुलगी झाली हो’ मालिकेत मी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त केल्या होत्या. या नव्या मालिकेत मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसेन. माझ्या मनात भावना साचलेल्या दिसतील कारण त्या व्यक्त करण्याची किंवा बोलण्याची वेगळी आव्हाने असतील. माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्यासोबत माझी जोडी जमलीय आणि त्याच्याबरोबर काम करायला मिळते आहे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. यात एक अभिनेत्री म्हणून माझा कस लागणार आहे म्हणून मी माझा आवाज आणि भाषा यावर जास्त मेहनत घेणार आहे.
दिव्या पुगावकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांनी प्रेक्षकांना मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही दिला. मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजित करताना समाज प्रबोधन केले की सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्याच अनुषंगाने स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा...’. घटस्फोट या अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर टिपण्णी करताना दिसणार आहे.
स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे म्हणाले की, ‘आम्ही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मालिका आणत असतो आणि अर्थातच त्यातून मनोरंजन देखील करीत असतो. मालिकेतून मनोरंजन होत नसेल तर प्रेक्षक ती मालिका धुडकावून लावतील. आम्ही मनोरंजन आणि ज्वलंत विषय यांची सांगड सामाजिक सजगता ठेऊन सादर करीत असतो. या मालिकांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यातील विषय, जे आजचे आहेत तसेच त्यातील घटना खऱ्या आयुष्यातील वाटाव्या इतक्या खऱ्या असतात. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा सारख्या मालिका पाहताना त्यांच्याबरोबर प्रेक्षक एकरूप होतो आणि तो प्रवास त्यांना एक नवी ऊर्जा देतो. त्यांचा आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणतो.”
ते पुढे म्हणाले की, 'एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही एक मालिका घेऊन येतोय. ‘मन धागा धागा जोडते नवा...’.मधून एका ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे, तो विषय म्हणजे घटस्फोट. पूर्वी बऱ्याच कुटुंबात हा शब्द उच्चारणेदेखील वर्ज्य होते. परंतु त्या शब्दाचा बाऊ बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे आणि महाराष्ट्रातही घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे आणि बरेच सिंगल पेरेंट्स दिसून येताहेत. परंतु त्यातून हेच अधोरेखित होते ते म्हणजे घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. मालिकेत एका मुलीचा घटस्फोट होतो. परंतु त्या नंतरही आयुष्यात सुख नांदू शकते हे दर्शविण्यात आले आहे. आयुष्याच्या प्रवासात घटस्फोटानंतर जीवन थांबत नाही किंवा आयुष्यात फक्त दुःख वास करते असेही नाही. तो प्रवास सुखकर सुद्धा असू शकतो हे दर्शविणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित व्यक्तीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘मन धागा धागा जोडते नवा ...’ ही मालिका एक प्रेरणादायी मालिका ठरू शकेल.'
हेही वाचा -Farhan Akhtar Puppetry Skills : फरहान अख्तरने नाचवली कठपुतळी, पाहा व्हिडिओ