मुंबई - ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ अशी अनेक नाटके केली आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. चि. वि. जोशी यांच्या चिमणराव या पात्राला त्यांनी अमरत्व दिले. तसेच ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ यातील टिपरेआबा आजही लोकांना आठवतात. अष्टपैलू कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या चतुरस्त्र कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेले आहे. अत्यंत मृदुभाषी असलेल्या प्रभावळकरांची लेखनातही गती आहे. झपाटलेला, एक डाव भुताचा, चौकट राजा, लगे रहो मुन्नाभाई सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी चौफेर अभिनय-फटकेबाजी केली आहे तसेच त्यांनी अनुदिनी, अवतीभवती, आवाज दिलीप प्रभावळकरांचा, एका खेळियाने, कागदी बाण, गुगली, चूकभूल द्यावी घ्यावी, झूम, बोक्या सातबंडे भाग १ ते ३, हसगत सारखी पुस्तके लिहिली ज्यावर एकांकिका, नाटकं बनली गेली.
सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. यावेळी मराठी रंगभूमीवर खास लहान मुलांसाठी मराठी नाटकं येत असतात. त्यातीलच एक म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या नॅशनल अवॉर्ड विनिंग कादंबरीवर आधारित नाटक 'बोक्या सातबंडे'. हे नाटक बालप्रेक्षकांना प्रचंड आवडतं असून त्यांचे भरमसाठ मनोरंजन होत आहे. सुरुवातीला 'बोक्या सातबंडे' ही कादंबरी लिहिली गेली होती आणि त्यातील दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या बोक्याच्या गमती जमती सर्वांनाच भावल्या होत्या. नंतर त्यावर चित्रपट बनला आणि त्यालादेखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आणि हाच 'बोक्या सातबंडे' आता रंगभूमीवर धमाल करताना दिसतोय.