मुंबई - संगीत जगात सर्वत्र पॉप्युलर आहे. संगीत हे कुठल्याही भाषेपलीकडे जाणारे असून त्यातील ताल कोणालाही ताल धरायला लावतो. संगीताची स्वतःची भाषा आहे आणि त्यामुळे कुठल्याही भाषेतील गाणी ती भाषा न समजणाऱ्या व्यक्तीलाही भावतात आणि हीच संगीताची ताकद आहे. आपल्याकडे संगीतात पारंगत असलेले अनेक कलाकार आहेत जे उत्तम गायक असतात परंतु संधी मिळत नाही. सांगीतिक रियालिटी शोजमध्ये तर इतके टॅलेंट दिसते की आश्चर्य वाटते की भारतातील कानाकोपऱ्यात किती प्रतिभा दडून बसलीय. म्हणूनच उत्तम टॅलेंट ला वेळीच संधी देणे हे संगीतकार आणि म्युझिक कंपन्यांचं कर्तव्य बनतं. त्यामुळेच सध्या असंही बघायला मिळते की संगीतक्षेत्रात
नवनवीन गाणी रसिकांच्या भेटीला येत असतात. अर्थात या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध म्युझिक कंपन्या या टॅलेन्टस चा शोध घेत संधी देतात आणि त्यामुळे संगीतरसिकांना नवीन आवाज परिचित होतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली पिकल म्युझिक कंपनी आणि त्याचे संस्थापक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी नेहमीच नवोदित गायक गायिकांना संधी देत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे, एका नवीन गायिकेच्या आवाजात. महत्वाचं म्हणजे हे गाणं मराठी असून ते गायलंय अमराठी सिंगर श्रुती रायने.
मन का शोधते... रोमँटिक गाणं -तसं बघायला गेलं तर चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका श्रेया घोषाल मराठी गाणी देखील गात असते आणि त्या मराठी गाण्यांसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. साहजिकच तिला फॉलो करणारे अनेकजण आहेत, ज्यात नवोदित गायिका देखील आहेत. त्यातीलच एक म्हणजे श्रुती राय. ही एक कॉलेजात शिकणारी युवती असून, एकही मराठीचा शब्द येत नसताना, तिने एक मराठी गाणं आणलं असून ते संगीतप्रेमींना भावेल अशी अपेक्षा ती बाळगून आहे. ‘मन का शोधते...' असे गाण्याचे बोल असून गाणं ऐकल्यावर तिला मराठी येत किंवा समजत नाही यावर विश्वास बसत नाही. अर्थात तिने या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेऊन गाणं गायलं आहे. ती संगीतप्रेमींसाठी 'मन का शोधते' हे रोमँटिक गाणं घेऊन आली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शब्दरचना, सुमधूर गायन आणि मनमोहक संगीत. याचे संमिलन करीत लक्षवेधी सादरीकरण केलंय दिग्दर्शक कैलाश पवार यांनी. त्यांनी गाण्याच्या व्हिडीओला दिलेली फ्रेश ट्रीटमेंट दृश्यमानता वाढविणारी आहे.