मुंबई- Bigg Boss 17 day 31 highlights: बिग बॉसचं 17 पर्व रंगतदार होतंय. प्रेक्षकांना आकर्षित करुन शोमध्ये गुंतवून ठेवण्यात स्पर्धक यशस्वी होताना दिसतात. घरामध्ये रोज क्षणोक्षणी रंजक गोष्टी घडत असल्यामुळे स्पर्धकांवर प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत. याला शोचा 31 वा एपिसोडही अपवाद नव्हता. मारामारीपासून घरातील बदलांपर्यंत मंगळवारी प्रसारित झालेला एपिसोड मनोरंजनाने परिपूर्ण होता.
गेल्या दोन दिवसांपासून बिग बॉस 17 च्या घरातील तापमान वाढत आहे. संपूर्ण घर सततच्या भांडणांनी रणमैदान बनलंय. काही लोकांच्यात नातं घट्ट होतंय तर इतरांमधील दरी आणखीन वाढतेय. 14 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये या सर्व पैलूंचे प्रदर्शन घडलं.
बिग बॉसचं रिपोर्ट कार्ड आणि घरातील बदल - मंगळवारच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बिग बॉसनं प्रत्येक घरातील सदस्याचे रिपोर्ट कार्ड सादर केलं आणि प्रत्येकाच्या बेडरूमची पुनर्रचना केली. मुनव्वर, मन्नारा, ईशा, अभिषेक, अंकिता आणि समर्थ यांना आता 'दिल' घरामध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. विकी, अरुण, अनुराग, सना आणि तहलका आता या घरात राहतात. एपिसोडच्या अखेरीस 'दम' घरात राहणाऱ्या नील, ऐश्वर्या, खानझादी, रिंकू, नावेद आणि जिग्ना यांच्यावर शोचा संपूर्ण फोकस गेला.
विक्की जैनची रुम शिफ्ट झाल्यामुळे अंकिता लोखंडे नाराज- 'बिग बॉस 17' चा हा एपिसोड अनेक टर्न आणि ट्विस्टनं भरलेला होता. बिग बॉसनं प्रत्येक खोलीतील सदस्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या, परिणामी विकी जैन 'दिमाग' खोलीत गेला तर अंकिता पुन्हा 'दिल'च्या खोलीत राहिली. 'दिमाग' खोलीत प्रवेश केल्यावर विकी आनंदी दिसला कारण त्याच्याकडे संपूर्ण घर नियंत्रित करण्याची शक्ती होती. मात्र, या बातमीने अंकिता मात्र नाराज झाली.
विकी जैनवर भडकली अंकिता लोखंडे - विकी जैन आणि अंकिता यांच्यातील एकेकाळचं स्थिर नातं आता डगमगलंय. दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत. तिच्यापासून दूर असूनही 'दिमाग' रूममध्ये तो चांगला वेळ घालवत असल्याचा आरोप तिनं केलाय. तो जेव्हा गार्डन परिसरात भेटला तेव्हा ती त्याच्यावर भडकली. त्याच्या वागण्यावरुन तिनं त्याला भरपूर ऐकवलं.