मुंबई- अभिनेता अनुपम खेर 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्याने आपला हा उत्साह चाहत्यांसोबत शेअर करताना X या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अनुपम श्रीरामाचं पुन्हा आयोध्येत परतण्यावर एक कविता सादर करताना दिसतो.
अनुपम खेरने हिंदीत एक लांबलचक चिठ्ठीही लिहिली आहे, "जय श्री राम! मी २२ जानेवारीला अयोध्येत माझ्या पूर्वजांचे आणि विशेषतः माझे आजोबा पंडित अमरनाथजींचे प्रतिनिधित्व करीन! या सर्वांचे राम मंदिर स्थापनेचे स्वप्न होते! माझ्या सर्व काश्मिरी हिंदू बंधू-भगिनी यावेळी आत्म्याने माझ्याबरोबर असतील!"
"श्रीराम लल्ला यांचे अयोध्येतील पुनरागमन हा आत्मविश्वास जागृत करते की, ज्याने त्यांची एखादी अवधपुरी कुठेतरी सोडली असेल, त्याला एक दिवस ती नक्कीच सापडते. या ऐतिहासिक सोहळ्यात मला सहभागी होण्याची संधी मिळाली हा श्रीरामाचा आशीर्वाद आहे. हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांसाठीही प्रार्थना करेन, " असे तो पुढे म्हणाला.
अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुडा, अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजर राहण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.