मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी या माध्यमाने खूप प्रगती केली आहे. खरंतर सुरुवातीला या माध्यमाला फारसं मनावर घेतलं जात नव्हतं. परंतु कोरोना या महामारीमुळे भले संपूर्ण जगाचे नुकसान झाले असेल परंतु त्या काळात ओटीटी माध्यम भरभराटीस आले. कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि जगाची चाके ठप्प झाली. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते आणि मनोरंजनासाठी त्यांनी या माध्यमाचा आसरा घेतला. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे सिनेमे प्रदर्शित होत नव्हते परंतु निर्मात्यांना त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. तेव्हा शक्कल लढविली गेली की चित्रपट डिजिटल माध्यमावर रिलीज केले तर काही प्रमाणात पैसे वळते होतील. तसेच अनेक लॉकडाऊन लागल्यामुळे ओटीटी माध्यम चित्रपटसृष्टीसाठी वरदान ठरले. नंतर ओटीटी जायंट्स स्वतः या माध्यमासाठी चित्रपट आणि सिरीज ची निर्मिती करू लागले. त्यामुळे इथेदेखील एक स्टार सिस्टिम तयार झाली आणि या स्टार सिस्टिम मधील सध्याची ओटीटी क्वीन आहे आदिती राव हैदरी.
‘ज्युबिली’ सिरीजमध्ये आदिती राव हैदरी- नुकतीच तिची महत्वपूर्ण भूमिका असलेली ‘ज्युबिली’ ही सिरीज प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली असून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. ही मालिका ३०-४०-५० च्या दशकातील सिनेमासृष्टीच्या वर्तुळाभोवती गुंफण्यात आली आहे. त्याकाळी फाळणी नंतर सिनेमाविश्वात काय घडत होतं याचं सविस्तर चित्रण यातून घडते. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित या सिरीज मध्ये प्रसोनजीत चॅटर्जी आणि अपारशक्ती खुराना सोबत आदिती राव हैदरी अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. ती ज्युबिलीमध्ये सुमित्रा कुमारी हे पात्र रंगवीत असून ती एक यशस्वी चित्रपट नायिका आणि स्टुडिओ हाऊस ची मालकीण दाखविली आहे. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातील चित्रपटसृष्टीतील राजकारण आणि अर्थकारण याभोवती कथानक फिरतं. यातील भूमिकेसाठी आदिती राव हैदरी ची भरपूर प्रशंसा केली जात आहे.
ताजमधील भूमिकेचे कौतुक - काही आठवड्यांपूर्वी आदिती राव हैदरी ची प्रमुख भूमिका असलेली, ताज - डिव्हायडेड बाय ब्लड ही सिरीज झी ५ ओटीटी वर प्रदर्शित झाली. धर्मेंद्र, नासिरुद्दीन शाह, झरीना वहाब, राहुल बोस सारखे मातब्बर कलाकार यात आहेत. नासिरुद्दीन शाह अकबर बादशाहच्या भूमिकेत असून आदिती राव हैदरी अनारकली च्या भूमिकेत आहे. या भव्य दिव्य ऐतिहासिक मालिकेत राजगादीवर बसण्यासाठी फक्त राजघराण्यात जन्म घेणे जरुरी आहे की गादीवर बसण्यासाठी ती व्यक्ती कर्तबगार असली पाहिजे या तत्वावर कारणमीमांसा देत उहापोह करण्यात आला आहे.