मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे चालण्याची परंपरा आहे, अर्थात प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तर. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणाऱ्या मालिका शक्यतो लांबवर चालतात. 'आई कुठे काय करते' ही स्टार प्रवाह (star pravah) वरील मालिका त्या वर्गात मोडते आणि म्हणूनच तिने नुकतीच प्रसारणाची तीन वर्ष पूर्ण (3 years completed of aai kuthe kay karte serial) केली आहेत. त्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. बंगाली मालिका 'श्रीमोई' खूप लोकप्रिय झाली आणि त्या मालिकेवर आधारित हिंदी मध्ये 'अनुपमा' नावाची मालिका बनवण्यात आली. तिला तुफान यश मिळाले. या दोन्हींवर आधारित मराठी मालिका बनवली गेली ती म्हणजे 'आई कुठे काय करते'.
मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले :तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte) मधील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) म्हणाली, 'तीन वर्षांचा हा प्रवास खरंच अविस्मरणीय होता. अगदी पहिल्या प्रोमोपासून या मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले आहे ते खरंच भारावून टाकणारे आहे. दहा वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने मी मालिका विश्वात पदार्पण केले. सातत्याने चांगले सीन लिहिले जाणे, ते चांगल्या पद्धतीने दिग्दर्शित केले जाणे आणि आम्हा कलाकारांकडून ते चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचे बळ मिळणे हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झाले. अरुंधती हे पात्र अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारे आणि उभारी देणारे आहे. या पात्रासाठी माझी निवड होईल असे कधीच वाटले नव्हते. सातत्याने तीन वर्ष अरुंधती हे पात्र जगायला मिळत आहे यासारखा दुसरा आनंद नाही.