मुंबई- शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिन्याहून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची गती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या चित्रपटातील पहिले गाणे 'जिंदा बंदा' ३१ जुलै रोजी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे नवे वारे संचारले होते. आता या गाण्याच्या निर्मितीची एक झलक निर्मात्यांनी शेअर केली आहे. या प्रमोशनल व्हिडिओचे मुख्य आकर्षण बनला आहे तो 'जवान' दिग्दर्शक अॅटली कुमार आणि शाहरुख खान यांनी डान्स दरम्यान शेअर केलेला एक सुंदर क्षण.
१ मिनिट आणि ३९ सेकंदांची ही व्हिडिओ क्लीप ऑडिओ रेकॉर्डरच्या शॉटसह सुरू होते आणि डान्सर्सच्या रिहर्सलमधील काही दृष्ये दिसायला लागतात. यात पडद्यामागे घडणाऱ्या अनेक गोष्टींचे दर्शन घडते. 'जिंदा बंदा' गाणे बनवताना किती कसरत शाहरुख आणि टीमला करावी लागली ही मेहनत आपल्याला पडद्यावर दिसते. या गाण्याच्या शुटिंग दरम्यान शाहरुखने तीन भाषेमध्ये लीप सींक केल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये काही वेळातच दिग्दर्शक अॅटली आणि शाहरुख खान यांनी शेअर केलेला एक सुंदर क्षण येतो. यामध्ये अॅटली शाहरुखला 'लाईफ टाईम मोमें बनवल्याबद्दल धन्यवाद देताना दिसत आहे. तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील तरुण दिग्दर्शकासोबत काम करत असताना समाधानी असलेल्या दिग्गज बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखला अॅटलीने प्रेमाने मिठी मारल्याचे दिसते. या दोघांमधील हा हळवा क्षण फ्लोअरवर उपस्थित असलेल्या अनेकांनी अनुभवला आणि जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा'चे शूटिंग पाच दिवस चालले होते. यातील शाहरुखच्या सुंदर स्टेप्स आणि अनिरुद्ध रविचंदरचे ताल धरायला लावणारे संगीत यामुळे या गाण्याला यूट्यूबवर ५४ दशलक्षाहून अधिक व्युव्ह्ज मिळाले आहेत. याच्या तमिळ आवृत्तीतील गाण्याला १३ दशलक्ष आणि तेलुगूतील गाण्याला ६ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.