मुंबई - Year Ender 2023 : साऊथ चित्रपटांसाठी 2023 वर्ष खूप खास होतं. चालू वर्षात, साऊथ चित्रपट 'जेलर' आणि 'लिओ'नं रुपेरी पडद्यावर खूप धमाल केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि अल्लू अर्जुन आणि केजीएफ स्टार यश यांचा एकही चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला नाही. त्यामुळं आता अनेकजण त्यांच्या चित्रपटांची खूप आतुरतेनं वाट पाहत आहे. 2024 मध्ये साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसणार, असं सध्या दिसत आहे. 2024 मध्ये साऊथ सुपरस्टारचे कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते जाणून घेऊया.
कल्कि 2898 एडी : अभिनेता प्रभास , अभिनेत्री दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी 'कल्कि 2898 एडी' या पॅन इंडिया चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं 600 कोटी बजेट आहे.
गुंटूर कारम : महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट 2024मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू 2024ची वर्षाची सुरुवात या चित्रपटानं करणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 असून या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रीलीला दिसेल.
लाल सलाम : चालू वर्ष 2023 मध्ये 'जेलर' चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर धमाल करणारा थलैवा रजनीकांत 2024ला 'लाल सलाम' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ध्वज रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटामध्ये थलैवासोबत कपिल देव दिसणार आहे.
थंगालान :तमिळ सुपरस्टार विक्रम स्टारर चित्रपट 'थंगालान' देखील 2024मध्ये रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री मालविका मोहनन देखील असेल. 'थंगालान'चं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल.
पुष्पा 2 :अल्लू अर्जुन 2024 मध्ये त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटानं धमाका करणार आहे. 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या पार्टची वाट खूप आतुरतेनं पाहत होते. आता अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
कांतारा 2 : चालू वर्षात, कन्नड स्टार ऋषभ शेट्टीनं 'कांतारा 2' या चित्रपटाची पहिली झलक दाखवली. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'चा प्रीक्वल आहे. रुपेरी पडद्यावर 'कांतारा 2' 2024 मध्ये रिलीज होईल.
गेम चेंजर : 'आरआरआर' फेम अभिनेता राम चरणचा 2023 मध्ये 'गेम चेंजर' चित्रपट प्रदर्शित होणार नाही. अनेकजण या चित्रपटची वाट पाहत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शंकर यांनी केलं आहे. हा चित्रपट 2024मध्ये रिलीज होईल.