मुंबई - Year Ender 2023: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्ससाठी 2023 हे वर्ष खूप चांगलं ठरलं आहे. 'पठाण', 'गदर-2', 'जवान', 'अॅनिमल' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. 'द नाईट मॅनेजर', 'राणा नायडू', 'फर्जी' या वेब सीरीजनं ओटीटीवर प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. यावर्षी, अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीवर पदार्पण केलं आहे. आपल्या दमदार अभिनयानं या कलाकारांनी चाहते आणि दर्शकांचं लक्ष ओटीटीकडे वळविलं. याशिवाय नव्या वर्षामध्ये देखील अनेक वेब सीरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहेत. या वर्षी कोणत्या स्टार्सनी ओटीटीवर डेब्यू केला हे जाणून घेऊया..
या वर्षी ओटीटी पदार्पण करणारे कलाकार
शाहिद कपूर- 'फर्जी' :अभिनेता शाहिद कपूरनं यावर्षी 'फर्जी'द्वारे ओटीटीवर पदार्पण केलं. यामध्ये साऊथ अभिनेत्री राशि खन्ना त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. या वेब सीरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केलं होतं. क्राइम ड्रामा वेब सीरीज 10 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित करण्यात आली होती.
विजय सेतुपती- 'फर्जी' :साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या विजय सेतुपतीनं यावर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावलं. शाहिद कपूरसोबत 'फर्जी' वेब सीरीजमधून त्यानं ओटीटीवर पदार्पण केलं. या वेब सीरीजमध्ये तो एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता.
अनिल कपूर - 'द नाईट मॅनेजर' :बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर जवळपास पाच दशकांपासून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ओटीटीची वाढती क्रेझ पाहून त्यानं यावर्षी 'द नाईट मॅनेजर'मधून ओटीटीवर पदार्पण केलं. अनिल कपूरनं या वेब सीरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.
आदित्य रॉय कपूर- 'द नाईट मॅनेजर' : 'आशिकी-2' मधून प्रसिद्धी मिळवलेल्या आदित्य रॉय कपूरनेही अनिल कपूरसोबत 'द नाईट मॅनेजर'मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. या वेब सीरीजमध्ये तो एका माजी नेव्ही अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. या व्यक्तिरेखेद्वारे त्यानं सर्वांची मनं जिंकली.
धर्मेंद्र- ताज डिवाइडेड बाय ब्लड : सुपरस्टार धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी डिजिटल जगतात प्रवेश केला. यावर्षी त्यांनी 'ताज डिवाइडेड बाय ब्लड' या वेब सीरीजद्वारे ओटीटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. या वेब सीरीजमध्ये त्यांनी शेख सलीम चिश्तीची भूमिका साकारली होती, जी त्याच्या चाहत्यांना खूप आवडली होती.
सोनाक्षी सिन्हा-दहाड :दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शत्रुघ्न सिन्हाची लाडकी मुलगी सोनाक्षीनं देखील यावर्षी ओटीटीवर नशीब आजमवलं आहे. झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या 'दहाड' या वेब सीरिजमधून तिनं ओटीटी करिअरला सुरुवात केली. यामध्ये ती महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती. या वेब सीरीजमध्ये ती एका सायको किलरचा पाठलाग करताना दिसली होती.
व्यंकटेश - 'राणा नायडू' :साऊथचा सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती हा प्रामुख्यानं तेलुगू सिनेमातील कामासाठी ओळखला जातो. या साऊथ सुपरस्टारनं 'राणा नायडू' मधून ओटीटी पदार्पण केलं. त्यानं पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर वेगळी भूमिका साकारली आहे.
करीना कपूर-जाने जान :बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरनं दिग्दर्शक सुजॉय घोषच्या मिस्ट्री थ्रिलर चित्रपट 'जाने जान'मधून ओटीटीमध्ये पदार्पण केलं. ही वेब सीरीज 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी गुन्हेगारी कादंबरीवर आधारित आहे. बेबोची ही वेब सीरीज 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली होती.
हेही वाचा :
- दाऊदच्या माणसांनी ठिकाणा कळू नये म्हणून गाडी फिरवून-फिरवून नेली होती त्याच्या घरी, ऋषी कपूर यांना सांगितला होता दाऊद भेटीचा किस्सा
- 'डंकी'च्या हार्ड हिटिंग डायलॉगवर चाहते झाले फिदा
- मुनावर फारुकी 'बाईलवेडा' असल्याचा एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशीने केला आरोप