बेंगळुरू- केजीएफ स्टार यश, कंतारा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि कॉमेडियन श्रद्धा जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे भेट घेतली. तसेच होंबळे फिल्म्सच्या कंतारा चित्रपटाचे निर्माते विजय किरगांडूर आणि दिवंगत कन्नड चित्रपट स्टार पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार हेदेखील पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या वेळी अभवादनासाठी हजर होते. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांनीही त्यांच्या कुटुंबीयांसह मोदींची भेट घेतली.
होंबळे फिल्म्सच्या अधिकृत हँडलने पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. सुंदर फोटोंच्या मालिकेसोबतचे कॅप्शन असे लिहिले आहे: नवीन भारत आणि प्रगतीशील कर्नाटकाला आकार देण्यासाठी आम्ही मनोरंजन उद्योगाच्या भूमिकेवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणादायी भेट घेतली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आम्हाला वाटतो.
कन्नडमधील सर्वाधिक यशस्वी निर्मिती संस्था होंबाळे फिल्म्स- होंबाळे फिल्म्स ही कन्नड चित्रपटसृष्टीतील आजच्या घडीला आघाडीवरील चित्रपट निर्मिती संस्था आहे. अभिनेता यश याच्या केजीएफची निर्मिती होंबाळे फिल्म्ससाठी मैलाचा दगड ठरला. केजीएफचा पहिला चित्रपट प्रचंड यश देऊन गेला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागासाठी अत्यंत खडतर परस्थितीत कलाकार आणि दिग्दर्शकच्या मागे होंबाळे फिल्म्स उभी राहिली. त्यामुळेच केजीएफने १००० कोटींची कमाई करुन बाहुबली चित्रपटाच्या कमाईशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याला घेऊन कंतारा या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानेही कमाल दाखवली आणि आता या चित्रपटाचा प्रीक्वेल बनवण्याची योजना आकाराला येत आहे.