मुंबई - Yash Chopras birth anniversary: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात यश चोप्रा यांचे नाव 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून कोरलं गेलंय. त्यांनी केवळ दीर्घ स्मरणात राहतील अशा केवळ प्रेमकथाच सादर केल्या नाहीत तर अनेक नामवंत अभिनेत्यांना रोमान्सच्या दुनियेचं नायक बनवलं. त्यांच्या दिग्दर्शनाच्या परीस स्पर्शाचा शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीवर खोलवर परिणाम झाला. यश चोप्रा यांच्यामुळेच हे नामवंत चित्रपटांमधल्या रोमान्सच्या दुनियेत गहिरे रंग भरू शकले. यश चोप्रा यांची आज 91 वी जयंती साजरी होतेय. बच्चन, ऋषी आणि शाहरुखला रोमॅंटिक व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकप्रिय ठरवण्यात 'यशराज'ची जादू कशी कामी आली, हे जाणून घेऊ या.
अमिताभ बच्चन यांची प्रतिमा रुपेरी पडद्यावर अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा बनली होती. सिलसिला या चित्रपटाने त्यांची ही प्रतिमा बदलून टाकली. सिलसिला चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता तरी अमिताभ बच्चन यांची रोमँटिक भूमिका करण्याची क्षमता यातून दिसून आली. यशा चोप्रा यांनी अमिताभ बच्चनची मृदू, रोमँटिक बाजू दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी निर्माण केलेल्या मोहब्बतें चित्रपटामुळे बिग बी नवीन पिढ्यांशी जोडले गेले.
शाहरुख खानला 'रोमान्सचा किंग' म्हणून ओळखलं जातं. त्याच्या या स्टारडमचे कर्ता धर्ता यश चोप्राच आहेत. त्यांचा सुरुवातीच्या 'डर' या चित्रपटात शाहरुखनं वेडसर, विकृत प्रेमी राहुल मेहराची भूमिका साकारली होती. या चित्रपटानं शाहरुखनं त्याच्या अष्टपैलूत्वाची क्षमता दाखवून दिली. त्याआधी बाजीगर, अंजाम सारख्या चित्रपटांमध्ये 'ग्रे' शेड साकारणाऱ्या शाहरुखला सर्वार्थानं रोमॅंटिजमचं 'किंग'पद बहाल करण्यात सर्वात मोठा वाटा यश चोप्रा निर्मित 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाचा आहे. राज मल्होत्रा, नाम तो सुना ही होगा, म्हणणारा शाहरुख रोमान्सचा समानार्थी शब्द बनला, त्यात यश चोप्रा यांचं श्रेय निःसंशय मोठं आहे.
यश चोप्रा आणि शाहरुख खान यांनी दिल तो पागल है, वीर-जारा आणि जब तक है जान यासारख्या चित्रपटातून रोमान्सचा हा सिलसिला जारी ठेवला. या चित्रपटातील शाहरुखच्या व्यक्तिरेखांनी त्याची 'किंग ऑफ रोमान्स' ही प्रतिमा अधिक मजबूत केली. रोमान्सचे हळवे क्षण पडद्यावर दाखवण्याची अद्भूत कला आणि त्या भावनांना सादर करण्याची शाहरुखची क्षमता यामुळे त्यांची ही भागीदारी महान बनली. यश चोप्रांच्या सहवासामुळे शाहरुख खानला पुढील अनेक वर्षांसाठी रोमँटिक स्टाइलवर राज्य करण्याचा मार्ग मोकळा झाला.
ऋषी कपूर यांना बॉलिवूडचा चॉकलेट हिरो समजलं जातं. यश चोप्रा यांच्यासोबत ऋषी कपूर यांनी कभी कभी हा चित्रपट केला यातील त्यांची मोहक आणि काव्यमय प्रेमीची छबी कायम स्मरणात राहिली. या चित्रपटात ऋषी कपूरनं साकारलेला अमित मल्होत्रा, सामाजिक नियमांच्या पलीकडे असलेल्या प्रेमाच्या चित्रपटाच्या थीमचे प्रतिबिंब होतं. त्यानंतर ऋषी कपूरची चांदनी चित्रपटातील रोमान्टिक भूमिकेची जादू वाढली. यश चोप्रा यांचं दिग्दर्शन आणि ऋषी कपूरची करिष्माई अभिनय यामुळे चांदनी हा कालातीत प्रेमकथा ठरला.