मुंबई - Womens Reservation Bill : लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठी भारत सरकारने मांडलेलं विधेयक लोकसभेत बुधवारी संमत झालं. पक्षांमधील सहमतीच्या अभावामुळे 27 वर्षांपासून निष्क्रिय राहिलेल्या या विधेयकाचं पुनरुज्जीवन झालं. या विधेयकाच्या निमित्तानं अभिनेत्री कंगना रणौत, ईशा गुप्ता आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कंगना रणौत आणि ईशा गुप्ता यांना संसदेच्या नवीन इमारतीतील पहिल्या कामकाजाला उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण मिळालं होतं. कंगनाने या विधेयकावर आपले विचार मांडताना सांगितलं की, ही एक अद्भुत कल्पना आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिलांच्या उन्नतीसाठी सरकारच्या प्रगतशील विचार करत असल्याचं सांगत कृतज्ञता व्यक्त केली. संसदेत उपस्थित असलेल्या ईशा गुप्ता या निमित्तानं म्हणाली की, महिलांना समान अधिकार देणारा हा एक उत्तम आणि अतिशय प्रगतीशील विचार आहे. हे आपल्या देशासाठी उचलेलं एक मोठं पाऊल आहे. पंतप्रधान मोदींनी जे वचन दिले आणि ते पूर्ण केलं.
या विधेयकावर आशा भोसले यांनी स्त्रियांना त्या किती शक्तिशाली आहेत याची जाणीव नसते. उदाहरणार्थ, मी आज एक कार्यक्रम केला आणि वयाच्या 90 व्या वर्षी तीन तास गायले. हीच स्त्री-शक्ती आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीतून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे उद्दिष्ट असणार आहे. स्त्री-पुरुष समानता आणि सर्वसमावेशक शासनाच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय.