मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा अखेर आज निकाल लागणार आहे. मात्र, वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आत्महत्या केलेली अभिनेत्री जिया खान नेमकी कोण आहे? तिचं चित्रपट सृष्टीत नेमकं काम काय? ती कुठून आली? तिच मूळ गाव कोणतं? या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर त्या आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. कारण तुम्हाला ही माहिती असणे गरजेचे आहे.
न्यूयॉर्क येथे जन्म -दिवंगत अभिनेत्री जिया खानचा जन्म 28 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्क येथे झाला. मात्र, जियाने 3 जून 2013 रोजी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या मुंबई येथील राहत्या घरी आत्महत्या केली. जियाने वयाचे 19 व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिला चित्रपट केला. त्या चित्रपटामुळे जिया खान हे नाव चर्चेत आलं आणि या चित्रपटामुळेच तिला ओळख मिळाली. जियाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिने लंडनला अभिनयाचं व इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेतलं व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.
19 व्या वर्षी पहिला चित्रपट - न्यूयॉर्क येथे जन्मलेली जिया खान बॉलीवूडमध्ये आपण देखील मोठी अभिनेत्री व्हावं अशी मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. तिला देखील टॉपची अभिनेत्री व्हायचं होतं. जियाच्या वडिलांचे नाव अली खान असून ते मूळचे भारतीय व सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. तर, जियाच्या आईचे नाव राबिया अमीन असून त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. वयाच्या 19व्या वर्षी 2007 मध्ये जियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत निशब्द हा पहिला सिनेमा केला.
केवळ 3 चित्रपटांमध्ये काम -जियाचा निशब्द हा सिनेमा इतका गाजला की तिचं फिल्म फेअरच्या उत्कृष्ट चित्रपट पदार्पण या पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं. यासोबतच जिया खानने आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा गजनीमध्ये देखील भूमिका निभावली आहे. सोबतच अक्षय कुमारच्या हाऊसफुल या चित्रपटात देखील जिया खानने काम केलं आहे. केवळ तीन चित्रपटांमध्येच काम करून ज्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
पेटा संस्थेची ॲम्बेसिडर - जियाला प्राण्यांवर प्रचंड प्रेम होतं. तिने पेटा या संस्थेसाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून देखील काम केलं आहे. सोबतच अनेक पर्यावरण प्रेमी संस्थांसाठी देखील तिने काम केलं असून, अनेक संस्थांना जियाने डोनेशन देखील दिले आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की जिया एक उत्कृष्ट प्रोफेशनल गायिका देखील होती. इतके असूनसुद्धा जियाने मात्र आपल्या राहत्या घरी वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली.
Jia Khan Profile : कोण आहे अभिनेत्री जिया खान? तिने का केली होती आत्महत्या? - का केली होती आत्महत्या
कोण आहे अभिनेत्री जिया खान, तुम्हाला माहिती आहे का? तसेच तिने का केली होती आत्महत्या, हे तरी आता आठवतंय का? या आणि तिच्यासंदर्भातील इतर प्रश्नांची उत्तरे पाहायची असतील तर ही बातमी नक्की वाचा...
![Jia Khan Profile : कोण आहे अभिनेत्री जिया खान? तिने का केली होती आत्महत्या? जिया खान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/1200-675-18367942-thumbnail-16x9-jia-khan.jpg)
जिया खान
Last Updated : Apr 28, 2023, 1:54 PM IST