मुंबई Welcome to the Jungle teaser : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं सेलिब्रिटींसह चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. अक्षय कुमारनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मेजवानी दिली आहे. त्यानं त्याच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' (वेलकम 3) चा मजेदार टीझर प्रदर्शित केला आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि स्टार कास्टही समोर आली आहे. 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा पार्ट 'वेलकम टू द जंगल' आहे. हा चित्रपट '20 डिसेंबर 2024' ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. 'वेलकम टू द जंगल'मध्ये अनेक कलाकार असणार आहेत.
अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'चा टीझर केला रिलीज : 'वेलकम टू द जंगल'च्या टीझरबद्दल सांगायचं तर हा टिझर खूप खास दिसत आहे. टीझरची सुरुवात ही जंगलापासून होते. या टिझरमध्ये चित्रपटामधील संपूर्ण स्टार कास्ट सैनिकांचा ड्रेस परिधान करून 'वेलकम 3'चं शीर्षक गीत गाताना दिसत आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये दिशा पटानी आणि अक्षय कुमार यांच्यात भांडण होताना दाखवलं आहे. या भांडणात रवीना टंडन ही हस्तक्षेप करताना दिसत आहे. या चित्रपटाची कहाणी काय असणार हे सध्या समजलं नाही, मात्र या चित्रपटात प्रचंड कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.