मुंबई - Indian Idol dedicated to Raj Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर 'इंडियन आयडॉल 14' या सिंगिंग टॅलेंट शोमध्ये पाहुणी म्हणून उपस्थित होती. या वीकेंडच्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकानं राज कपूरला समर्पित परफॉर्मन्स केला. या स्पर्धकाच्या गायनादरम्यान करिश्मा भावूक झाल्याचं दिसलं. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या वतीनं इन्स्टाग्रामवर या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये करिश्माच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसतायत.
'इंडियन आयडॉल'ची स्पर्धक असलेल्या महिमा भट्टाचार्जीनं राज कपूर यांना समर्पित परफॉर्मन्स देताना करून 'मेरा नाम जोकर' मधील जोकर मंचावर साकारला. यात ती राजू या पात्रासारखी वेशभूषा करून आली होती. यावेळी तिनं 'जीना यहाँ, मरना यहाँ' हे गाणे गायले आणि तिच्या भावपूर्ण आवाजाने स्पर्धचे जज आणि प्रेक्षकांच्याही हृदयाला स्पर्श केला. परफॉर्मन्स पाहिल्यानंतर करिश्माला आपल्या भावनांना आवर घालणं कठीण झालं. यावर बोलताना ती म्हणाली की, आम्ही आज जे काही आहोत ते या गाण्यासारखेच आहोत.
चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक राहिलेले दिवंगत राज कपूर यांना भारतीय चित्रपट आणि मनोरंजनाच्या इतिहासातील 'सर्वोत्कृष्ट शोमन' म्हणून ओळखले जाते. या दिग्गज अभिनेत्याचा जन्म पेशावर येथे झाला होता. वडील-अभिनेता पृथ्वीराज कपूर यांच्याकडून अभिनयाचा वारसा त्यांना मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीत अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेल्या राज कपूर यांचा संपूर्ण परिवार आजही हिंदी चित्रपटसृष्टीत भरीव योगदान देतो. राज कपूर यांच्या नातवंडांनाही हा वारसा नेटानं पुढे सुरू ठेवलाय. करीना आणि करिश्मा या बहिणींनी या क्षेत्रात पदार्पण करुन 'हम किसेसे कम नहीं' हे दाखवून दिलंय.
राज कपूर यांनी भारतातील 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 11 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले होते. वयाच्या दहाव्या वर्षी 1935 मध्ये रिलीज झालेल्या 'इन्कलाब'मध्ये ते पहिल्यांदा हिंदी चित्रपटात दिसले. 1947 मध्ये रिलीज झालेल्या 'नील कमल' चित्रपटामार्फत त्यांना अभिनेता म्हणून मोठा ब्रेक मिळाला. यात त्यांची मधुबालाबरोबर भूमिका होती. वयाच्या तिशीच्या आत प्रस्थापित निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून लौकिक प्राप्त करण्याचा, 'आर के स्टुडिओ' चा मालक बनण्याची करामत करुन दाखवली. देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर हे त्रिकूट चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवत असताना देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्याइतकाच राज कपूर यांचा चाहतावर्गही मोठा होता.
दिग्गज कलावंत असलेल्या राज कपूर यांना 1971 मध्ये त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 1987 मध्ये त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नंही सन्मानित करण्यात आलं. 'आवारा' (1951) आणि 'बूट पॉलिश' (1954) या चित्रपटांसाठी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पाल्मे डी'ओरच्या भव्य पारितोषिकासाठी ते दोन वेळा नामांकित झाले होते. त्याकाळच्या सोव्हिएट रशियामध्येसुद्धा त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग होता.