हैदराबाद - सुपरस्टार शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी निर्मात्यांनी बुधवारी चेन्नईतील श्री साईराम कॉलेजच्या मैदानावर एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शाहरुखसह चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कुमार, अभिनेत्री प्रियामणी आणि साऊथ स्टार विजय सेतुपती यांनी हजेरी लावली आहे. यासाठी साऊथ सुपरस्टार आणि स्क्रीन आयकॉन कमल हासनने व्हर्चुअली हजेरी लावत शाहरुखला जवानच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
शाहरुख खान आणि कमल हासन यांनी दोन दशकापूर्वी 'हे राम' या चित्रपटातून एकत्र काम केले होते. २००० मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समिक्षकांनी भरपूर कौतुक केले होते. आज पार पडत असलेल्या 'जवान' चित्रपटाच्या प्री रिलीज सोहळ्यात कमल हासनने शाहरुख खानचे तोंडभरून कौतुक केले. 'जवान'च्या यशासाठी त्याने शुभच्छाही दिल्या. 'पठाण' या चित्रपटाला मिळालेल्या यशाहून जवानचे यश अधिक ब्लॉकबस्टर राहील अशी आशा त्याने व्यक्त केली. व्हर्चुअली सामील होताना व्हिडीओमध्ये कमल म्हणत आहे की, 'शाहरुख हा भारतावरील प्रेमाचा प्रतीक आहे. हा चित्रपट यशस्वी व्हावा अशी माझी मानापसूनची इच्छा आहे. दिग्दर्शक अॅटलीसाठी मी खूप आनंदी आहे.'
'जवान' चित्रपटाचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने शाहरुख खानसोबत 'जिंदा बंदा' गाण्याच्या तमिळ व्हर्जनवर जबरदस्त एन्ट्री केली. शाहरुखही या गाण्यावर बेभान होऊन थिरकताना दिसला. त्याला इतेक उदंड प्रेम चेन्नईतून पहिल्यांदाच मिळत आहे. त्याने जेव्हा 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट केला होता तेव्हा रजनीकांतसाठी 'लुंगी डान्स' हे गाणे त्याने खास बनवले होते. हे गाणे त्याने 'थलैयवासा'ठी खास समर्पित केले होते. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट आले पण 'जवान' चित्रपटाला साऊथ इंडियातून मिळत असलेला पाठींबा लक्ष वेधणारा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे 'जवान'चा दिग्दर्शक अॅटली कुमार याचा असलेला जबरदस्त करिश्मा. आजपर्यंत त्याचा एकही चित्रपट अपयशी ठरलेला नाही. याशिवाय या चित्रपटात साऊथ लेडी सुपरस्टार नयनतारा आणि सुपरस्टार विजय सेतुपती यांची उपस्थिती चित्रपटाच्या यशात मोलाची भर टाकणारी आहे.
अॅटली दिग्दर्शित बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर येण्यासाठी झळकणार आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शनने बनवलेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर आणि इतर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.