मुंबई- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याचा आगामी चित्रपट जरा हटके जरा बचकेच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या चित्रपटामध्ये सारा अली खान देखील मुख्य भूमिकेत आहे. सारा कान्सच्या रेड कार्पेटवर चालण्यात बिझी झाली असताना विकीने मात्र आपले प्रमोशनचे काम चोख पार पाडले. त्याने महाराष्ट्रीतील ठाणेसह इतर ठिकाणी हजेरी लावून जरा हटके जरा बचकेचे प्रमोशन केले. प्रमोशनल इव्हेंटमध्ये विकीच्या हजर राहण्यामुळे चाहत्यामध्ये उत्साह संचारला. त्याच्या फिमेल फॅन्स त्याला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. विकीच्या एका चाहतीने तर कहरच केला, ती म्हणाली की 'पुढच्या 7 जन्मांसाठी जोडीदार' म्हणून तो आपला जोडीदार असेल.
किकी, पुढील सात जन्म तू माझा राहशील- ठाण्यात जरा हटके जरा बचके प्रमोशनचे अनेक व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत. व्हायरल व्हिडिओंमध्ये, विकी स्टेजवर येण्यापूर्वी फोटो आणि हँडशेकसह चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. त्याची झलक पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायालाही विकीने अभिवान करत संवाद साधला. चाहत्यांशी संवाद साधताना, विकीला त्याची एका कट्टर चाहती भेटली आणि म्हणाली की, 'कॅटरिना या जन्मात तुझी असली तरी पुढचे सात जन्म तू माझाच राहशील.' चाहतीला आलेला प्रेमाचा हा पुळका पाहून विक्की हात जोडून कृतज्ञतेने नतमस्तक झाला आणि म्हणाला, 'माझंही तुझ्यावर प्रेम आहे.' विकीच्या या एका वाक्याने त्या चाहतीला गगन ठेंगणे वाटू लागले असेल यात काही शंका नाही.