मुंबई - Sunny Deol reveals truth Of viral video : सनी देओल त्याच्या अलिकडेच रिलीज झालेल्या 'गदर 2' च्या यशामुळे खप चर्चेत आला होता. आता सोशल मीडियावर पुन्हा त्याचीच चर्चा होताना दिसते. मात्र ही चर्चा तो मद्यधुंद होऊन जुहू सर्कलवर ऑटोरिक्षात बसला असल्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे आहे. बुधवारी सनीने सोशल मीडियावर आपल्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य उघड केले.
सनी देओलचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये तो रस्तैा ओलांडत एकट्याने ऑटोरिक्षाच्या चालकापाशी येतो. त्याला पाहून तो रिक्षा चालक गाडीतून उतरतो आणि मद्यधुंद असलेला सनी देओल रिक्षा बसतो असा हा व्हिडिओ आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओमागील सत्य आता समोर आले आहे.
खरं तर सनी देओल 'सफर' नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता, त्यामुळे तो दारूच्या नशेत नव्हता तर अभिनय करत होता. हा चित्रपट 'प्रवाह' या मराठी चित्रपटाचा रिमेक असून शशांक उद्रापूरकर दिग्दर्शित आहे. या व्हिडिओमुळे चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे यामागचे सत्य उलगडण्यासाठी सनीनं त्या व्हिडिओच्या प्रसंगी रस्त्यावर शूटिंगच्या क्रूचा कॅमेऱ्यासह असलेला व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो जीन्स आणि कॅज्युअल पांढरा शर्ट परिधान करून ऑटो चालकाशी बोलताना दिसतोय. या व्हिडिओला त्यानं "अफवाहों का 'सफर' बस यहीं तक", असे कॅपशन दिलंय.
हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला. काहींनी सहानुभूती व्यक्त केली, काहींनी हा डीपफेक व्हिडिओ असल्याचे मानले आणि काहींनी तो खरोखर नशेत असल्याचे मानले. युजर्सच्या एका वेगळ्या गटाला असे वाटले की तो चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
काही महिन्यांपूर्वी, देओलने एका मुलाखतीत सांगितले की तो मद्यपान करत नाही आणि लोक दारूचा आनंद कसा घेऊ शकतात आणि ते स्वतःला कसे हाताळू शकतात असा प्रश्न देखील केला होता. "हे कडू आहे, दुर्गंधी आहे आणि तुम्हाला डोकेदुखी देते," असेही तो म्हणाला होता. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेकांच्या मनात त्याचा विषय घोळत होता.