मुंबई - सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या संदर्भात अभिनेत्री कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षित हातात आहे आणि त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही', असे कंगना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे म्हणाली.
कंगनाची प्रतिक्रिया- अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, 'आम्ही कलाकार आहोत. सलमान खानला केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्याला घाबरण्यासारखे काही कारण नाही.' अभिनेत्री कंगना पुढे म्हणाली, 'जेव्हा मला धमकावण्यात आले, तेव्हा मला सरकारने सुरक्षाही दिली होती, आज देश सुरक्षित हातात आहे. आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.'
काय म्हणाला होता सलमान खान? - कंगनाची ही प्रतिक्रिया वरवर पाहता सलमानच्या एका टीव्ही शोमध्ये अलीकडील वक्तव्या संदर्भात आहे, जिथे तो जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल बोलला होता. जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. शनिवारी, सलमानने त्याचा अनुभव आणि तो कसा हाताळत आहे हे सांगितले आणि उपहासाने म्हटले: 'दुबई पूर्णपणे सुरक्षित आहे, भारतात समस्या आहे.' 57 वर्षीय अभिनेता सलमान पुढे म्हणाला, 'सुरक्षा ही असुरक्षिततेपेक्षा चांगली आहे. एक गंभीर धोका आहे, म्हणूनच सुरक्षा आहे'.