मुंबई - Vivek Agnihotri announces Parva : 'द ताश्कंद फाईल' आणि 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री हे 'पर्व' हा आगामी महत्त्वकांक्षी चित्रपट बनवणार आहे. ख्यातनाम कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांनी लिहिलेल्या 'पर्व' कादंबरीवर आधारित हा चित्रपट असेल. तीन भागामध्ये चित्रपटाची मालिका करण्याचा निश्चय त्यांनी केलाय. विवेक यांनी सोशल मीडियावर 'पर्व' फ्रँचाइजीचे तीन चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलंय. या फ्रंचाइजीची निर्मिती विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी करणार आहे. प्रकाश बालेवाडी 'पर्व' चित्रपटाचं सह लेखक म्हणून काम करत आहेत आणि कादंबरीचे मुळ लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, पद्मश्री एस एल भैरप्पा आहेत.
'पर्व' चित्रपटाचं कथानक एस एल भैरप्पा यांच्या कन्नड भाषेतील गाजलेल्या कादंबरीचं रुपांतर असेल. ही कादंबरी संस्कृत भाषेतील महाकाव्य महाभारत ग्रंथावर आधारित आहे. भैरप्पा यांचे कार्य आधुनिक क्लासिक म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या 'पर्व'सह इतर अनेक साहित्याला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी X वर चित्रपटाचा फर्स्ट लुक देखील शेअर केला आहे. थोडक्यात, महाभारत विषयावर आधारित भव्य चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय विवेक अग्निहोत्री यांनी घेतलाय. हे शिवधनुष्य ते कसं पेलणार हे आगामी काळ ठरवणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांना नुकताच त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडलेल्या या समारंभात 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.