मुंबई -गेली अनेक वर्षे, कोरोना संक्रमणाची दोन वर्षे वगळता, मुंबईतील चाकरमानी शिमगा, होळी, गणपती सारख्या सणांना आवर्जून कोंकणात जातो. कोंकणवासीयांसाठी त्यांचा प्रदेश हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया एव्हढाच, किंबहुना काकणभर जास्तच, सरस. याच मातीतील एक कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, ‘विशू’ या चित्रपटातून. ‘ये मालवण कहा आया? यहा दिल में... ‘ असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ 'विशू' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसतेय. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार करणारा आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आरवीच्या येण्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. विशूच्या अस्थिरतेला 'ती'चा किनारा मिळेल? 'विशू' नक्की कोण आहे ? आजवर लपलेले सत्य 'विशू'ला कळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'विशू' पाहिल्यावर मिळणार आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनशैलींचे दर्शन 'विशू'मध्ये घडत आहे. काँक्रीटच्या जंगलात माणूसपण हरवलेले लोक आणि गावात आजही माणुसकी जपणारे, मनापासून पाहुणचार करणारे लोक दिसत आहेत. निळाशार समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि तिथली डौलदार घरे असे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि कर्णमधुर वाटणारी मालवणी भाषा 'विशू'मध्ये पाहायला मिळणार आहे.