मुंबई - सध्या सर्वभाषिक चित्रपटसृष्टींमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांची देवाण घेवाण होताना दिसतेय. खासकरून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक क्षेत्रातील व्यक्ती हिंदी आणि मराठीमध्ये कामं करताना दिसताहेत. मराठी चित्रपटांना इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील कलाकार सन्मान देताना दिसतात. आता आगामी मराठी चित्रपट 'विरजण' साठी दाक्षिणात्य गायिका मंगली पार्श्वगायन करणार आहे. रुपालीताई चाकणकर, ज्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर 'विरजण' चित्रपटातून अभिनय पदार्पण करीत आहे.
साऊथच्या फिल्म्स मध्ये प्रतिभासंपन्न गायिका म्हणून मंगलीकडे बघितले जाते. साऊथच्या सिनेमामध्ये तिची अफाट लोकप्रियता आहे. अतिशय समरस होऊन ती गाणे गात असताना आपल्या आवाजाच्या जादुने ती रसिकांना मत्रुग्ध करत असते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झेंडा रोवल्यानंतर ती आता 'विरजण' चित्रपटातील 'देवा' गाण्यातून मराठी चित्रपट विश्वात प्रवेश केला आहे. नुकताच 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'विरजण' या चित्रपटाचा संगीतअनावरण सोहळा संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते करण्यात आला. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संजय चोरडिया, मेघराज भोसले, प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच 'विरजण' चित्रपटातील तंत्रज्ञ, गायक, कलाकार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती.