मुंबई - स्क्रिन आयकॉन कमल हासनचा 69 वा वाढदिवस चेन्नई, तामिळनाडू येथे अतिशय उत्साहात साजरा झाला. यासाठी एका स्टार स्टडेड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकांसह असंख्य सेलेब्रिटी हजर होते. यावेळी जय भीम फेम अभिनेता सुर्या पाहुणा म्हणून हजर होता, तर या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील एक सरप्राईज गेस्ट होता - आमिर खान.
कमल हासननं चेन्नईतील एका आलिशान हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तमिळ चित्रपटातील तारे तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. यासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये जयभीम फेम सुर्या हजर होता. या समारंभात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं उपस्थिती लालल्यानं पार्टीची रंगत आणखी वाढली.
रवी के चंद्रन हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पार्टीला उपस्थित होते आणि आमिर खान आणि सुर्या या दोघांचा एक संस्मरणीय सेल्फी त्यांनी शेअर केला आहे. या फोटोनं दोन फिल्म इंडस्ट्रीत असलेलं सौहार्द दाखवून दिलंय. सर्वांसाठी हा क्षण संस्मरणीय होता. आमिर आणि सुर्यासोबतचा सेल्फी शेअर करताना रवी के चंद्रन या X वर ( पूर्वी ट्विटर ) लिहिले, 'कमल हासन वाढदिवस पार्टी. या पार्टीत सुर्या आणि आमिर खान हे दोन गजनी एकाच फ्रेममध्ये. रवी यांनी आमिर आणि सुर्यासोबतचा सेल्फी शेअर केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. रवीच्या टाइमलाइनवर 'एका फ्रेममध्ये दोन गजनी' फोटोला आतापर्यंत 119.9K व्ह्यू मिळाले आहेत.'
X वर एक लांबलचक तमिळ पोस्ट शेअर करताना दिग्दर्शक आणि अभिनेता पार्थिवननं कमल हासनच्या 69 व्या वाढदिवसाच्या पार्टीतील आमिर खानसोबतच्या भेटीचं वर्णन करणारी पोस्ट लिहिलीय. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या सर्वाधिक आवडीचा व्यक्ती आमिर खान असल्याचं म्हटलंय. या भेटीमध्ये आमिरसोबत छान संभाषण झाल्याचं तो म्हणाला. अलिकडेच एका शूटिंग दरम्यान पार्थिवननच्या कपाळाला दुखापत झाली होती. त्याची विचारपूसही आमिर खाननं केली. आमिरची आई चेन्नईतील रुग्णालयात उपचार घेतेय, त्याबद्दलही बोलणं झाल्याचं पार्थिवननं म्हटलंय.