मुंबई- विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित अमेझॉन प्राइम व्हिडिओची मूळ मालिका ज्युबिली 7 एप्रिल रोजी प्रीमियर होणार, असे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने शुक्रवारी जाहीर केले. 10 भागांच्या या काल्पनिक नाट्यमय मालिकेचे दिग्दर्शन मोटवने यांनी केले आहे. त्याने सौमिक सेन सोबत हा शो देखील तयार केला आहे. अतुल सभरवाल यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर, ज्युबिली ही एक रोमहर्षक पण काव्यात्मक कथा आहे. उत्कटता, महत्त्वाकांक्षा आणि प्रेम यांचा पाठपुरावा करण्यासाठी ते कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार आहेत अशा पात्रांच्या भोवती याची कथा गुंफलेली आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन फिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. यात प्रोसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर या आघाडीच्या कलाकारांसह इतरांचा समावेश आहे. ज्युबिली म्हणजे सिनेमाच्या जादूचा उत्सव; ही जादू आमच्यासाठी पडद्यावर विणणाऱ्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना अर्पण करत आहे, असे प्राईम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी एका निवेदनात म्हटले आहे.