मुंबई - Sam Bahadur : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या धाडसी, धुरंधर, मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाचं चरित्र प्रेक्षकांना 1 डिसेंबर 2023 रोजी पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. खऱ्या आयुष्यावर आधारित असलेली ही कथा प्रत्येक भारतीयांचं मनं जिंकेल, हे नक्कीच. या चित्रपटात 1962 मध्ये भारत - चीन युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीबरोबर झालेले संभाषण देखील दाखवलं जाणार आहे.
सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित : माणेकशॉ यांचा 1971 मध्ये इंदिरा गांधींबरोबरच्या वादाबद्दलचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. माणेकशॉ यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याहून संपूर्णपणे वेगळे विचार मांडले होते. त्यांनी संभाषणादरम्यान इंदिरा गांधींना युद्ध जिंकायचं आहे की नाही, असंदेखील विचारलं होतं. या प्रश्नाचा इंदिरा गांधी यांना राग आला होता. या संभाषणादरम्यान माणेकशॉ यांचे इंदिरा गांधीबरोबर मतभेद झाले होते. 1971 मार्चमध्येच भारतानं पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी इंदिरा गांधींची इच्छा होती. यासाठी इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशॉ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माणेकशॉ यांनी हल्ला करण्यास नकार दिला. नकार देण्यामागचे कारण असं होतं की, त्यावेळी भारतीय सैन्य हल्ल्यासाठी तयार नव्हतं. यावेळी माणेकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना सहा महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यांनी यावेळी भारत जिंकेल, याची हमी देखील दिली होती.