हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेता चंद्र मोहन यांच्या आकस्मिक निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआरनं X वर शोक व्यक्त केला आहे. अनेक दशकांपासून विविध चरित्र भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्या दिवंगत अभिनेता चंद्र मोहन यांना ज्यु. एनटीआरनं आदरांजली वाहिली.
11 नोव्हेंबर रोजी चंद्र मोहन यांच्यावर काळानं झडप घातली. अनपेक्षितपणे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्यामुळे तेलुगू चित्रपट उद्योगानं एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. अनेक महत्त्वाच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ७८ वर्षीय कलाकार चंद्र मोहन यांनी सकाळी ९.४५ वाजता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
आरआरआर अभिनेता ज्युनियर एनटीआर यांनी चंद्र मोहन यांच्या अकाली जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केलं. एका पोस्टमध्ये, त्यांनी कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त करत अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीतील अभिनेता चंद्र मोहन यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल गौरव केला आहे. अभिनेता चंद्र मोहन यांच्या निधनाच्या बातमीनं तेलुगु फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलाय. अनेक निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक आणि कालाकार त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. चंद्र मोहन यांनी तेलुगु फिल्म इंडस्ट्रीची दीर्घकाळ सेवा केल्याच व त्याच्या योगदानाची दखल सर्वाजण घेत आहेत. त्याच्या कुंटुंबीयांचं सांत्वन केलं जातंय. फिल्म इंडस्ट्री शिवाय इतर क्षेतातील कोलांनाही या बातमीमुळे दुःख झालयं.
तेलुगू चित्रपटांमधील प्रख्यात महान अभिनेता चंद्र मोहन यांना साऊथमधील एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. रंगुला रत्नम सारख्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात त्यांची भूमिका खूप गाजली होती. यासाठी त्यांचे समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. साऊथ स्टार एमजीआर यांच्यासोबत 'नलाई नमाधे' या चित्रपटातून पदार्पण करून त्यांचा सिनेसृष्टीचा प्रवास खूप दीर्घ काळाचा राहिला आहे.