महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जयवंत वाडकरचा राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावर डल्ला! - Varhadi Vajantri Marathi Movie

विजय पाटकर दिग्दर्शित वऱ्हाडी वाजंत्री या आगामी चित्रपटात प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. त्यांना यासाठी अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री साक्षी परांजपे आणि शितल कलाहापुरे यांनी साथ दिली आहे. 'वऱ्हाडी वाजंत्री' ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

जयवंत वाडकरचा राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावर डल्ला!
जयवंत वाडकरचा राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावर डल्ला!

By

Published : Nov 9, 2022, 12:37 PM IST

सर्वांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या वऱ्हाडी वाजंत्री या आगामी चित्रपटात प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. त्यांना यासाठी अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री साक्षी परांजपे आणि शितल कलाहापुरे यांनी साथ दिली आहे. आता अश्या प्रकारच्या अनेक सिच्युएशन्स या चित्रपट असून प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होणार आहे.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडेंचा उल्लेख येताच अमराठी लोकांनाही 'व्यक्ती आणि वल्ली'ची अनाहुतपणे आठवण होते. 'वऱ्हाडी वाजंत्री' या आगामी मराठी चित्रपटामध्येही अशीच वल्ली कॅरेक्टर्स प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करण्यासाठी एकवटली आहेत. मराठी रंगभूमीपासून मराठी-हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत वाडकर 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत.

'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट म्हणजे फुल टू धमाल असून याबाबत जयवंत वाडकर म्हणाले की, “वैभव परबनं अतिशय सुरेख लेखन केल्यामुळं आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये काम करताना खूप धमाल आली. दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. कोणत्याही लग्नात वेगवेगळ्या स्वभावाची, भिन्न विचारांची आणि निरनिराळे हेतू असलेली मंडळी एकत्र येतात आणि लग्नसोहळा साजरा करतात. या सोहळ्यात मी रावसाहेब नावाच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे. याचा लग्नात मिळणाऱ्या आहेरावर डोळा आहे. आहेराच्या पैशावर हात साफ करण्यासाठी हा लग्नाला आला आहे. हे कॅरेक्टर ग्रे शेडेड नाही. काहींना पैसे बघितले की ते आपल्याकडे यावेत असं वाटतं अशांपैकी हा आहे. चित्रपटात याची फॅमिलीही आहे. याचे वडील वयस्कर असल्यानं त्यांना उचलून लग्नात आणताना फुल धमाल होते. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखं आहे. विजयनं सर्व कॅरेक्टर्स एकाच फ्रेममध्ये सादर केली आहेत. रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे. पॅडी कांबळे आणि हेमांगी कवीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल.”

या चित्रपटाची निर्मिती स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका पेक्षा एक वल्ली कॅरेक्टर पहायला मिळणार असल्याचं जयवंत यांनी सांगितलं. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहायला हवा असा हा चित्रपट आहे आणि तो प्रेक्षकांचे फूल टू मनोरंजन करेल अशी ग्वाही निर्माते आणि दिग्दर्शकाने दिली आहे.

अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला 'वऱ्हाडी वाजंत्री' ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'डिब्बुक'नंतर निकिता दत्ता 'घरत गणपती'मधून करणार मराठी पदार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details