मुंबई :अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद म्हणाली, मुस्लिम घर मालक आपल्याला मुंबईत कुठेही घर भाडेतत्त्वावर देत नाहीत. यासोबतच हिंदू घर मालकही आपल्याला घर देत नसल्याची खंत उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहण्यासाठी उर्फी भाडेतत्त्वावर घर शोधत आहे. मात्र आपल्या कपड्यांमुळे आपल्याला कोणीही घर देत नसल्याचे उर्फीने ट्विटमधून सांगितले आहे. उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातूनही खंत व्यक्त केल्यानंतर तिच्या फॅन्सकडून देखील यावर प्रतिक्रिया यायला सुरू झाली आहे. काही फॅन्सने तिच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी या ट्विट नंतर पुन्हा एकदा उर्फी जावेदची खिल्ली उडवली आहे.
चित्रा वाघ यांच्यासोबतचा वाद :उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. उर्फी जावेदच्या कपड्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे. तिने आपल्या कपड्यांमध्ये बदल करावा नाहीतर ती भेटेल त्या ठिकाणी तिला झोडपून काढू असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला होता. यानंतर उर्फी जावेत हिने चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसात आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. तसेच उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर वेळोवेळी ट्विट करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.