महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'चूक करण मानवी, क्षमा करणं दैवी' म्हणत, त्रिशा कृष्णननं मन्सूर अलीला केलं माफ - मन्सूर अलीला नमतं घ्यावं लागलं

Trisha reacts on Mansoor Ali Khan apology : मन्सूर अली खाननं अभिनेत्री त्रिशा कृष्णनची माफी मागितल्यानंतर त्रिशानंही त्याला मोठ्या मनानं माफ केलंय. 'चूक करणे मानवी आहे, क्षमा करणे हे दैवी आहे', असे कोट करुन तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Trisha reacts on Mansoor Ali Khan apology
त्रिशा कृष्णननं मन्सूर अलीला केलं माफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 5:51 PM IST

मुंबई - Trisha reacts on Mansoor Ali Khan apology : अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत असभ्य भाषेत कमेंट केल्यामुळे तमिळ अभिनेता मन्सूर अली खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. गेल्या काही दिवासापासून यावर बरीच चर्चा दाक्षिणात्य फिल्म आणि इतर क्षेत्रात सुरू होती. महिला आयोगानं कारवाईचा बडगा उगारल्या नंतर मन्सूर अलीला नमतं घ्यावं लागलं आणि त्यानं जाहीरपणे त्रिशाची माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मन्सूरनं माफी मागितल्यानंतर त्रिशानंही तिच्या सोशल मीडियावर एक छोटी पोस्ट लिहून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

त्रिशानं आपल्या पोस्टमध्ये अलेक्झांडर पोपचं एक प्रसिद्ध विधान कोट म्हणून वापरलं आहे. तिनं लिहिलं, "To err is human,to forgive is divine" याचा अर्थ आहे की, "चूक करणे मानवी आहे, क्षमा करणे हे दैवी आहे." हा कोट अलेक्झांडर पोपच्या “एन एसे ऑन क्रिटिसिझम” मधील आहे. "सर्व लोक पाप करतात आणि चूका करतात. देव त्यांना क्षमा करतो आणि लोक जेव्हा माफ करतात तेव्हा ते देवासारखे वागतात", असे अलेक्झांडर पोप यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकात म्हटलं होतं. हाच संदर्भ त्रिशा कृष्णननं मन्सूर अली खानच्या माफीनाम्यानंतर वापरला आहे.

मन्सूर अली खाननं एका निवेदनाद्वारे झालेल्या प्रकाराबद्दल त्रिशा कृष्णनची माफी मागितली होती. त्यापूर्वी त्याच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. 'लिओ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्रिशासोबत काश्मीरमध्ये बेडरुम सीन करायला मिळाला नाही, असे म्हणाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर 'लिओ' चित्रपटाच्या दिग्दर्शकांपासून दक्षिणेतील चिरंजीवीसारख्या दिग्गजांनी मन्सूर अलीवर टीका केली होती.

अभिनेत्री त्रिशा कृष्णनंही एक ट्विट करुन त्याच्या विधानाला विरोध केला होता. मन्सूर अलीचं विधान 'लैंगिकतावादी, अनादरकारक आणि तिरस्करणीय', असल्याचं त्रिशानं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि मन्सूर अलीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 A (लैंगिक छळ) आणि 509 (महिलेचा अपमानजनक विनय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश तमिळ पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. यानंतर मात्र मन्सूर अलीला माघार घ्यावी लागली आणि तो माफीनामा देऊन मोकळा झाला.

तमिळ चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मन्सूर अली खाननं 'कॅप्टन प्रभाकरन' सारख्या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली होती. तमिळ सिनेमांच्या पलीकडे त्यानं तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्याच्या अलीकडील 'लिओ' चित्रपटानंतरहा वाद निर्माण झाला. त्याचा आगामी चित्रपट 'सरक्कू' 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

दरम्यान, त्रिशा कृष्णन हिनं अलिकडेच रिलीज झालेल्या 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाच्या दोन्ही भागात भूमिका साकारली होती. 'द रोड' सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकेमुळे तिला लोकप्रिया मिळाली. अलिकडे रिलीज झालेला 'लिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. 'विद्दा मुरयार्क' आणि 'राम: भाग 1' या आगामी तमिळ चित्रपटात ती काम करत आहे.

हेही वाचा -

  1. 'त्रिशा, प्लिज मला माफ कर', म्हणत मन्सूर अली खाननं मागितली माफी

2.अर्जुन रेड्डीचा बचाव करणाऱ्या रश्मिका मंदान्नावर 'प्रेमात आंधळी' झाल्याची टीका

3.ख्यातनाम निर्माता राज कुमार कोहली यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

ABOUT THE AUTHOR

...view details