चेन्नई- तामिळ अभिनेता मन्सूर अली खाननं शुक्रवारी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अखेर माफी मागितली. कायदेशीर कारवाईची धमकी दिल्यानंतर मन्सूर अली खाननं खेद व्यक्त केला. सोशल मीडियात एक निवेदन प्रसिद्ध करुन त्यांनं आपला माफीनामा सादर केला. "त्रिशा, प्लीज मला माफ कर!" , म्हणत त्यानं तिच्या भावी आयुष्यासाठी मांगल्याची प्रार्थना केली आणि आशीर्वादही दिले.
राष्ट्रीय महिला आयोगाने त्रिशाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मन्सूर अली खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी मन्सूरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 A आणि 509 अंतर्गत आरोप लावले आहेत. लैंगिक छळ आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेल्या कृतींचा संदर्भातील ही कायद्याची कलमे आहेत.
यापूर्वी, अभिनेत्री आणि भाजप खासदार आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी मन्सूरवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी लिहिले, "NCW च्या सदस्या या नात्याने मी मन्सूर अली खानचे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आधीच मांडले आहे आणि योग्य ती कारवाई करणार आहे. अशा आक्षेपार्ह विचारांपासून कोणीही दूर जाऊ शकत नाही."
याला प्रत्युत्तर म्हणून मन्सूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती आणि आपल्या विधानावर तो ठाम राहिला होता. त्यानं माफी मागण्यासही नकार दिला होता. यावेळी तो म्हणाला होता की, "मला वैयक्तिकरित्या असे म्हणायचे नव्हतं. जर एखाद्या चित्रपटात बलात्कार किंवा खुनाचे दृश्य असेल तर ते खरं असतं का? याचा अर्थ वास्तविक बलात्कार आहे का? चित्रपटातील खून म्हणजे काय असतं? याचा अर्थ ते खरोखरच एखाद्याची हत्या करतात का? मी माफी का मागू? मी काहीही चुकीचे बोललो नाही. मी सर्व अभिनेत्रींना मान देतो."
मात्र गेल्या काही दिवसापासून दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्या या भूमिकेवर भरपूर टीका झाली. त्याच्या विरोधात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली मतं मांडली. आपल्या विरोधात वातावरण तयार होत असल्याचं पाहून मन्सूर नरमला आहे. त्यानं आता माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.