मुंबई - शाहीर साबळे यांची जीवनगाथा पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणार आहे. महाराष्ट्र शाहीर या साबळेंच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा भव्य ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दमदार संवाद, रंजक सत्यकथा, शाहीरी कवने आणि श्रवणीय संगीत असलेला हा ट्रेलर शाहीर साबळेंचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी उत्कंठा वाढवणारा आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील शाहीरांचे योगदान - शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्या खेड्यात जन्मलेले शाहीर यांचे गायन सर्वांनाच आवडायचे. परंतु गाण्यामुळे पोट भरत नाही, हे आपले काम नाही अशी समज त्यांच्या आई आणि आजीची होती. गाण्याच्या नादात मुलगा शिकत नाही म्हणून आईने त्यांना अंमळनेरला आजीकडे शिकायला पाठवले. पण तिथेही त्यांनी गाण्याचा ध्यास सोडला नाही. अंमळनेरला असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. जाणते झाल्यानंतर ते साने गुरुजींच्या समाजिक कार्यतही सक्रिय झाले. याच काळात ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले आणि ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले. पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली आणि स्वातंत्र्यानंतर शाहीर साबळे यांनी गोवामुक्ती संग्राम, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात आपल्या पहाडी आवाजाने त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.
लोककला जपणारे शाहीर - लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार झालेले शाहीर साबळे मुंबईला आल्यावर या लोककलांना सामाजिक बदलाची जोड देऊन गाऊ लागले. अभंग, वाघ्या-मुरळी, बाल्या नाच, भारूड, कोळीगीते शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा अशा लोककलांसाठी त्यांनी 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम लोकप्रिय बनवला. या दरम्यान त्यांची पत्नी भानुमती यांनी मोलाची साथ दिली. त्या उत्तम कविता करत असत आणि शाहीर साबळे त्यांना चाली लावून लोकजागर करत. शाहीर साबळेंचे असे दैदिप्यमान जीवन त्यांचा नातू केदार शिंदे यांनी रुपेरी पडद्यावर मांडले आहे.