मुंबई - Leo early morning shows : सुपरस्टार थलपती विजयचा 'लिओ' चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचे करोडो फॅन्स रिलीसाठी उतावीळ झालेत. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा थिएटरमध्ये दाखवण्यात आला तेव्हा चाहत्यांचा उन्माद पाहायला मिळाला. 'लिओ' चित्रपटाच्या ट्रेलरच्या स्क्रिनिंगदरम्यान सुपरस्टार थलपथी विजयच्या चाहत्यांनी केलेल्या उद्धट वर्तनामुळे तमिळनाडूतील चित्रपटगृहांमध्ये ट्रेलर रिलीज इव्हेंट्सवर बंदी घालण्यात आलीय. या महिन्याच्या सुरुवातीला चेन्नईच्या एका थिएटरमध्ये विजयच्या समर्थकांनी थिएटरचं नुकसान केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. याव्यतिरिक्त, सरकारने लिओ चित्रपटाच्या पहाटेच्या शोवर बंदी घातली आहे, त्यामुळे लिओ आता फक्त 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपट व्यापार विश्लेषक असलेल्या मनोबाला विजयबालन यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्यांनी चेन्नईच्या रोहिणी थिएटरम 'लिओ' चित्रपटाच्या ट्रेलर स्क्रिनिंग दरम्यान, चाहत्यांनी केलेल्या नासधूसीचे फोटो शेअर केले. त्यानंतर थिएटर ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी जाहीर केले की, ते यापुढे चित्रपटगृहांमध्ये ट्रेलर प्रदर्शित करणार नाहीत.
थलपती विजयची भूमिका असलेला 'लिओ' हा या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहत्यांना एक भव्य अनुभव देण्यासाठी सेव्हन स्क्रीन स्टुडिओ प्रॉडक्शनने चित्रपटाचा पहिला शो पहाटे 4 वाजता दाखवण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाकडे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी पहाटे ४ वाजता तमिळनाडूमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली. मात्र, न्यायालयाने सकाळी 4 वाजताच्या शोबाबत निर्णय घेण्याचं टाळलं आणि तामिळनाडू सरकारला सकाळी 7 वाजताच्या शोबाबत त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. नंतर, सकाळी 7 च्या शोलाही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे पहिला शो सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.