महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tractor rally of farmers for TDM : टीडीएम चित्रपटासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, काढला ट्रॅक्टर मोर्चा! - टीडीएम चित्रपटाला पाठिंबा

टीडीएम चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत हा मुद्दा आता शेतकरी आंदोलनाचा बनला आहे. भाऊराव कऱ्हाडे हा शेतीची पार्श्वभूमी असलेला ग्रामीण दिग्दर्शक आहे. त्याच्या पाठींब्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला.

Etv Bharat
टीडीएम चित्रपटासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर

By

Published : May 9, 2023, 8:06 PM IST

मुंबई- आपल्याकडे अनेक आंदोलनं होत असतात आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी इतरही लोक रस्त्यावर उतरत असतात. बऱ्याचदा हा बाहेरून मिळणारा पाठिंबा राजकीय हेतूने प्रेरित असतो. त्यामुळे, कदाचित, आंदोलनकर्त्यांचे खच्चीकरणही होते आणि मूळ आंदोलन भरकटले जाते. परंतु पहिल्यांदाच लोकं एखाद्या सिनेमासाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी बांधव चक्क रस्त्यावर उतरलेला दिसला. टीडीएम चित्रपट नुकताच रिलीज झाला आणि त्या चित्रपटामध्ये ट्रॅक्टर चे अनोखे महत्व आहे. मराठी चित्रपटांची गळचेपी होते हे सर्वश्रुत आहे. बरेच चित्रपटगृह मालक आणि मल्टिप्लेक्स मराठी चित्रपटांना चांगल्या वेळेचे शोज देत नाहीत किंवा अजिबातच शोज देत नाहीत. हिंदी मधील फालतू चित्रपटालाही स्क्रीन्स मिळतात परंतु चांगल्या मराठी चित्रपटांना ते अव्हेरले जातात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘टीडीएम’ हा चित्रपटदेखील याला अपवाद नाही. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना मिळणारी सापत्न वागणूक पाहून अनेकांचे पित्त खवळले. ग्रामीण समस्यांना वाचा फोडणारा चित्रपट टीडीएम’ साठी शेतकरी बांधवांनी एकत्र येत 'टीडीएम' चित्रपटाला न्याय मिळवून द्यायला ट्रॅक्टर मोर्चा काढला.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे टीडीएम चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला ज्यात ग्रामीण भागातून अनेकांनी उस्फूतपणे भाग घेतला. ‘मराठी सिनेमाची मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे' अशी स्लोगन्स देत शेतकरी बांधव मोर्च्यात सहभागी झाले. अर्थात मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळावा यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शक सरकार दरबारी हेलपाटे घालताना दिसतात. तसेच काही निर्माते ज्यांना राजकीय पार्टीचा सपोर्ट आहे, त्यांनीदेखील वेळोवेळी धाकदपटशा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवसांनंतर सर्व काही ये रे माझ्या मागल्या स्थितीत येते. परंतु पुण्यात निघालेला हा मोर्चा संबंधितांचे डोळे उघडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. संपूर्ण सिनेसृष्टीत अश्या प्रकारची अचंबित घडणारी ही पहिलीच घटना.

'टीडीएम' ला शो मिळत नसल्या कारणास्तव राजकीय नेते अजित पवार यांनी देखील या चित्रपटाला स्क्रीन मिळण्याबाबत ट्विट केलं होत. मात्र पालथ्या घड्यावर पाणी. बऱ्याच प्रेक्षकांनीदेखील ओरड केली की त्यांना हा चित्रपट बघण्याची इच्छा आहे परंतु त्याचा थिएटर मालकांवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळेच ‘टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ खेड्यापाड्यातून ते एकत्र आले आणि शेतकरी बांधवांसोबत छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथून ट्रॅक्टर मोर्चा काढला. अनेकांनी यांत उस्फुर्तपणे सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शविला.

अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन या अन्यायाचा मुकाबला करण्याचे ठरविले आहे. टीडीएम चित्रपट आणि भाऊरावांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ते सर्व एकत्रितपणे संघर्ष करणार आहेत. टीडीएम च्या निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले आहे त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहांत बघण्याची संधी प्राप्त होईल.

हेही वाचा -Adipurush trailer out: प्रभासचे दमदार संवाद, क्रितीचा सोज्वळ लुक, तर सैफची फक्त एक झलक!

ABOUT THE AUTHOR

...view details