सैराट ११० कोटी कमाई - सैराट हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय - अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.
'पावनखिंड' कमाई ६१ कोटी - पावनखिंड हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स प्रस्तुत आणि अॅलमंड्स क्रिएशन्स निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.
नटसम्राट एकूण कमाई - ५० कोटी - नटसम्राट- असा नट होणे नाही हा एक कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित चित्रपट आहे. नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. या चित्रपटात रंगमंचावरील अभिनेत्याचे दुःखद कौटुंबिक जीवन दर्शविले गेले आहे ज्यांनी अभिनयातून निवृत्त झाले आहे परंतु थिएटर आणि रंगमंचावरील त्यांच्या आवडत्या आठवणींना विसरण्यास अक्षम केले आहे. नाना पाटेकर यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती.
लई भारी - एकूण कमाई ४१ कोटी- लई भारी हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात राधिका आपटे आणि आदिती पोहनकर मुख्य अभिनेत्री होते. शरद केळकर, उदय टिकेकर आणि तन्वी आझमी या चित्रपटाचे सह-कलाकार होते. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा आणि सलमान खान यांच्या या चित्रपटात छोट्या भूमिका आहेत. हा चित्रपट २०१४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. २५ जानेवारी २०१५ रोजी लई भारीने मागील सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट महाराष्ट्रात १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत चित्रपटगृहांमध्ये होता.
कट्यार काळजात घुसली एकूण कमाई ४० कोटी -कट्यार काळजात घुसली हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे संगीत व वसंतराव देशपांडे ह्यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीताच्या सर्वोत्तम नमुन्यांपैकी एक मानले जाते. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉंसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावे व शंकर महादेवन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे सचिन प्रथमच नकारात्मक भूमिकेमध्ये चमकला. तसेच ह्या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याने प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.