महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Akeeli trailer : 'अकेली' चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज, नुश्रत भरुच्चाने जिंकली प्रेक्षकांची मने - प्रणय मेश्राम अकेली

प्रणय मेश्राम अकेली या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकत आहे. नुश्रत भरुच्चा यात मुख्य भूमिकेत असून अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार या चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

Akeeli trailer
'अकेली' चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज

By

Published : Aug 4, 2023, 7:41 PM IST

मुंबई - 'अकेली' या आगामी चित्रपटातून प्रणय मेश्राम बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकिय पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दशमी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. इराकच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या या चित्रपटात इस्त्रायली अभिनेत्यांसह नुश्रत भरुच्चा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. अंगावर शाहरे आणणारा हा ट्रेलर प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते.

इराकवर २०१४ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेने 'अकेली' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. दहशतवादी एका कपडे शिवण्याच्या कारखान्याला घेतरतात आणि त्यातील काम करणाऱ्या महिलांना बंदी बनवले जाते. यामध्ये पंजाबमधून कामासाठी गेलेली एक ज्योती नावाची महिला आहे. अनेक बंदी महिलांना दहशतवादी स्वतःची गरज म्हणून घेऊन जातात. त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. या बंदीतून ज्योती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करते. अखेर ती सापडते आणि दहशतवाद्यांच्या म्होरक्याची बेगम बनण्याची तिला ऑफर दिली जाते. मात्र तिला भारतात आपल्या कुटुंबात परत जायचे आहे. ती भारतात परत येते का?, तिची सुटका होणार का?, तिला कोण मदत करणार?, असे असंख्य प्रश्न ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला पडतात. एक अतिशय रंजक कथा या चित्रपटातून पडद्यावर साकारली जाणार आहे याची खात्री आपल्याला ट्रेलर देतो.

यात दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ज्योतीची भूमिका अभिनेत्री नुश्रत भरुच्चाने केली आहे. एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून आजवर तिने आपला लौकिक सिद्ध केला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. महिला केंद्रीत चित्रपटांची नायिका म्हणून तिने आजवर असंख्य चित्रपटांचे ओझे तिने आपल्या खांद्यावर पेलेले आहे. या चित्रपटातही ती हमखास या भूमिकेला न्याय देईल असे ट्रेलरवरुन वाटते. नुश्रात शिवाय या सिनेमामध्ये त्साही हालेवी आणि आमिर बोउट्रोस या इस्रायली अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आहेत.'फौदा' या त्यांच्या गाजलेल्या मालिकेमुळे दोघेही सर्व परिचित आहेत. याशिवाय 'अकेली' चित्रपटात निशांत दहियाचीही महात्त्वपूर्ण भूमिका यात आहे.

'अकेली' या चित्रपटाची निर्मिती निनाद वेद्य, नितीन वैद्य, अपर्णा पाडगावकर, सुशांत शाह आणि विकी सिदाना यांनी केली आहे. दशमी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणारा प्रणय मेश्राम दिग्दर्शित 'अकेली' चित्रपट १८ ऑगस्ट रोजी देश आणि विदेशात रिलीज केला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details