मुंबई- सुपरस्टार रजनीकांतचे चाहते नेल्सन दिलीपकुमारच्या आगामी 'जेलर' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आगामी 'जेलर' हा अॅक्शन कॉमेडी चित्रपटातून रजनीकांत दोन वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. रजनीकांतचे एआर मुरुगाडोस दिग्दर्शित 'दरबार' आणि सिवा दिग्दर्शित 'अन्नाथे' हे चित्रपट फारशी कामगिरी करु न शकल्यामुळे चाहत्यांना 'जेलर' चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
शुक्रवारी जे'लर' चित्रपटाच्या भव्या आणि नेत्रदीपक ऑडिओ लॉन्च सोहळा चेन्नईत पार पडला. नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये रंगलेल्या या सोहळ्यात तमाम चाहते उत्साहात हजर होते. या कार्यक्रमाला अनेक सेलेब्रिटी हजर होते, मात्र रजनीकांतच्या उपस्थितीने चाहत्यांना आनंद द्विगुणित झाल्याचे दिसले. या कार्यक्रमाचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. यात शेकडो चाहते थलैयवाचा जयजयकार करताना बेभान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमात रजनीकांतने काळा ड्रेस परिधान केला होता. त्याचा हा जबरदस्त लूक २०१८ मध्ये आलेल्या पा. रंजीत दिग्दर्शित 'काला' चित्रपटातील त्याच्या लूकची आठवण करुन देणारा होता. रजनीकांतचे आगमन होताच चाहत्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. त्यानंतर रजनीने जेलर चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छाही दिल्या.
रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपट २०० कोटी बजेटमध्ये कलानिधी मारन यांच्या सन पिक्चर्स या बॅनरखाली तयार झाला आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, रम्या कृष्णन आणि तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जेलर चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविंचदर यांनी केले असून विजय कार्तिक कन्नन यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभळली आहे.