मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. गेल्या आठवड्यात अभिनेत्री शिल्पाच्या जुहू येथील घरातून काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. यानंतर तक्रारीच्या आधारे जुहू पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व चोरीचा तपास सुरू होता. या संदर्भात तपास पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वीही शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी - शिल्पा शेट्टीच्या घरी नेमक्या कोणत्या मौल्यावान वस्तु चोरीला गेल्या होत्या याचा अधिक तपशील समजू शकलेला नाही. शिल्पाच्या घरी चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १० वर्षापूर्वी तिच्या जुहू येथील घरातून म्युझिक सिस्टीम आणि आयपॅड चोरीला गेले होते. या संबंधी त्यावेळी पोलिसात तक्रारही दाखल झाली होती. मात्र पुढे काय कारवाई झाली याबद्दल कळू शकले नव्हते.
सेलेब्रिटींच्या घरी चोरीची प्रकरणे - बॉलिवूड सेलेब्रिटींना अनेकदा चोरी प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे. खरंतर त्याच्या घरी कडक सुरक्षा व्यवस्था असते. अनेक सुरक्षा रक्षकांचे कडे त्यांनी उभे केलेले असते तरीही चोऱ्या होतात. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या घरात एका चोराने २५ हजार चोरले होते. मात्र ही गोष्ट पहाऱ्यावरील रक्षकांच्या लक्षात आली आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून एकदा हिऱ्यांचा हाराची चोरी झाली होती. सोनमने हा हार पार्टीत घातला होता व त्यानंतर पाच लाख किंमत असलेल्या या हाराची चोरी झाली. अजय देवगणच्या घरी सफाईसाठी एका कंपनीचे लोक आले होते. त्यांनी सफाई करुन जाताना सोन्याच्या काही बांगड्यांचीही सफाई केली. पोलिस तपासात हे चोरटे सापडले आणि सर्वांवर गुन्हा दाखल झाला होता.
विमानतळावरील चोरीचा मामला - सुष्मिता सेन ग्रीसमध्ये गेली असताना विमानतळावरुन तिचे सर्व सामान चोरीला गेले होते व अंगावरील कपड्यानिशी तिला रिकाम्या हाताने घरी परतावे गाले होते. असाच प्रसंग कॅटरिना कैफवरही गुदरला होता. ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतताना तिने खरेदी केलेले ७२ लाख रुपयांच्या कपड्यांची बॅग चोरीला गेली होती.