मुंबई - सध्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय, शिवकालीन चित्रपटांना तर काकणभर जास्तच. एक ऐतिहासिक शिवकालीन चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ येत असून त्याची निर्मिती उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची असून त्याची प्रस्तुती करताहेत संदीप मोहितेपाटील. 'सरसेनापती हंबीरराव' हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर महापराक्रमी, शस्त्र निपुण, युद्धकला पारंगत असे भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. या चित्रपटाची अतीव उत्सुकता असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्मदिवस. या त्रिवेणी मुहूर्तावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रचंड ऊर्जा देणारे 'सरसेनापती हंबीरराव' यांच्या गुण वर्णनाचे हे गीत प्रणित कुलकर्णी यांनी लिहिले असून संगीत अविनाश - विश्वजित यांचे आहे. प्रत्येकवेळी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या या महापराक्रमी योध्याचे वर्णन या गीतामध्ये ऐकायला मिळते. आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजात हे गीत ऐकताना व पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो.