मुंबई - प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती चोखंदळ रसिकांसाठी नेहमी पर्वणी ठरत असते. एखाद्या चित्रपटाचा अंदाज करणे बऱ्याचदा अडचणीचे ठरते. मात्र त्या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवते ती त्याची पहिली झलक. आता एक नवा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे, पण यातील कलाकार, क्रू मेंबर्स आणि इतर सर्व तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. या चित्रपटाचे शीर्षक आहे 'द रॅबिट हाऊस'.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित केला आहे. यामध्ये एक महिला साडी नेसून पर्वताच्या कड्यावर पाठमोरी उभी असलेली दिसते. तरुण असलेल्या या महिलेने तिचे केस वेणीमध्ये छान बांधले आहेत व ती समोर डोंगर दऱ्याकडे पाहताना दिसते. मंद संगीत सुरू असताना कोणीतरी मोठ्याने आवाज देते आणि ती तरुण महिला दचकते. तिला कुठल्या तरी संकटाची चाहुल लागते आणि ती तिथून पळ काढते. ती फ्रेम मधून बाहेर जाताच आपल्याला एक लाकडी अक्षरे कोरलेला फलक दिसतो. त्यावर 'द रॅबिट हाऊस' असे लिहिलेले आहे आणि हेच चित्रपटाचे शीर्षक आहे.
'द रॅबिट हाऊस' चित्रपटाची ही पहिली झलक अनेक बाजूने गूढ आहे. ज्या ठिकाणी ती महिला आणि फलक उभा आहे ती दुर्गम हिमालयीन पर्वतरांगेमधील एक जागा वाटते. एकंदरीतच काहीतरी मिस्टेरियस घडणार आहे याची खात्री झलक पाहताना दिसते. निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक यूट्यूबवर रिलीज केली असून याला 'पहला राज़ खुला है आज, जल्द दिखेगा अब हमराज़' अशी बाय लाइन दिली आहे. ३० सेकंदाच्या क्लिपमध्ये जेव्हा शीर्षकाचा फलक दिसतो त्याच्या मागून 'राज भी...हमराझ भी', असे टेक्स्ट दिसतात. अशा प्रकारे एक कल्पक झलक शेअर करुन निर्मात्यांनी चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवत ठेवली आहे.
झलक पाहून चित्रपटाबद्दलचा कोणताही अंदाज करणे शक्य नाही. परंतु एक दर्जेदार गूढ कथा पाहायला मिळू शकते असा विश्वास बाळगायला सध्या तरी हरकत नाही. येत्या काही दिवसात चित्रपटबद्दलचा तपशील उघड करण्यात येईल तेव्हा या चित्रपटाचे टीम, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या बद्दलची माहिती आपल्याला होईल. त्यामुळे सध्या तरी केवळ प्रतीक्षा करणे इतकेच आपल्या हाती आहे.