मुंबई- बाहुबलीच्या तुफान यशानंतर दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आर आर आर’ ने सुद्धा प्रचंड यश मिळविले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम प्रस्थापित केलेला चित्रपट म्हणजे बाहुबली. बाहुबलीने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय चित्रपटाची परिभाषा बदलली. याचं सर्वार्थाने श्रेय जातं ते हे भव्य दिव्य स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना. अर्थातच भारतातील प्रत्येक कलाकाराचे स्वप्न आहे की त्यांच्याबरोबर काम करायला मिळावे. मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडे हे एस एस राजामौली यांचे भक्तच, त्यामुळे त्यांच्या आगामी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चा ट्रेलर त्यांनी राजामौली यांना हैदराबाद येथे दाखविला आणि त्यांनी ट्रेलर बघून पाठीवर दिलेली थाप कुठल्याही पुरस्कारापेक्षा छोटी नव्हती.
राजामौली यांच्यासोबत झालेल्या या भेटीने दिग्दर्शक प्रविण तरडे अतिशय भारावून गेले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यांनी आमच्याशी अतिशय सहृदयतेने संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली."
या भेटीबद्दल निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, "जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा समोर आले, आमच्याशी बोलले तेव्हा हे दडपण आपोआप गळून पडलं. चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही बडेजाव नसलेलं, अतिशय साधं व्यक्तिमत्त्व म्हणजे राजामौली सर हे या भेटीत जाणवलं."