मुंबई - शाळेत प्रत्येकजण इतिहास शिकलेला असतो. त्यात खासकरून मराठ्यांच्या लढाया आणि पराक्रम उर भरून आणतात. परंतु आपल्या मावळ्यांनी प्रत्येक लढाई जिंकली असे नाही. काही लढायांत त्यांना हार देखील पत्करावी लागली होती. परंतु त्या हरण्याने कोलमडून न जाता ते जिद्दीने पुन्हा उभे राहिले. लढायामध्ये मर्दुमकी दाखवत पुन्हा विजय प्राप्त केला आहे. ऐतिहासिक चित्रपट आपले ज्ञान वाढवितात आणि इतिहासात नेमके काय घडले असेल याची जाणीव करून देतात. आता बलुचिस्तानच्या लढाईचे उदाहरण घ्या. या लढाईत मराठ्यांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्यांना गुलामगिरीही सहन करावी लागली होती. परंतु लाचारी आणि गुलामी मराठ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि धमन्यांमधून वाहणारे सळसळते रक्त शांत बसू देत नव्हते.
बलोच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च - मराठ्यांना बलुचिस्तानात झालेल्या लढाईत पराभव पत्करावा लागला होता. परंतु हार मानतील ते मराठे कसले? त्यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतलाच. बलुचिस्तानातील हालअपेष्टा सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यावर मात करून पुन्हा एकदा विजय प्राप्त करीत भगवा झेंडा अटकेपार रोवला. याच लढाईवर आधारित एक मराठी सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे 'बलोच'. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रंगारंग कार्यक्रमात अनावरीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत राजेशाही थाटात करण्यात आले तसेच रांगोळी, तुतारी, ढोल ताशे हेदेखील कार्यक्रमचं मराठमोळंपण वृद्धिंगत करीत होते.
जबरदस्त ऐतिहासिक कथानक - बलोच ही गुलामगिरी पत्करूनही ज्याने हार मानली नाही अशा एका मराठी लढवय्याची कहाणी आहे. तसेच या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' या गाण्यातून त्याचे निरागस प्रेम सुद्धा दिसून येते. या चित्रपटातील रोमांचकारी लढाया चित्रपटाची शोभा वाढविते तर नवरा बायकोमधील हळुवार प्रेम मनाला भावते. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यातील संवाद. दमदार संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील आणि भव्य युद्धप्रसंग अंगावर शहारे आणतील. या चित्रपटात एका बाजूला निरागस प्रेम दिसेल तर दुसरीकडे बलुचिस्तानमधील प्रखर युद्ध अनुभवायला मिळेल असे दिग्दर्शक सांगतात.