मुंबई - घरापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी 'रात ही' हे गाणं आपलं वाटेल. दिवाळीच्या निमित्ताने 'सनी'तील हे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून त्यातून होमसिक' बनालेल्यांसाठीचा एक भावनिक प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले 'सनी' चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे.
कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याला निखिल डिसुझा याचा आवाज लाभला आहे. इरावती कर्णिक लिखित 'सनी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे.