मुंबई - आपल्या चित्रपटांमध्ये संगीत हा अविभाज्य भाग आहे. त्यातच आपल्या चित्रपटांत हमखास रोमँटिक गाणी असतात. फेब्रुवारी महिना प्रेमीयुगुलांसाठी खास मानला जातो. आता 'टीडीएम' मधील 'एक फुल' हे गाणं व्हायरल झालं असून प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडेच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध झालंय 'एक फुल' हे गाणं गाजतंय.
आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे बाहेर आल्यापासून त्याला संगीतप्रेमींचा भरघोस पाठिंबा मिळतोय. 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी सांभाळली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत. 'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता 'एक फुल' या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत.
मराठी चित्रपटात गाणी मंत्रमुग्ध करतात हे काही नवे नाही. परंतु 'टीडीएम' मधील 'एक फूल वाहतो सखे' गाणे इतराहून वेगळे आहे. यात अस्सल गावरान रोमान्स ठासून भरलेला आहे. गाण्याची सुरुवात होते तेव्हा नायक ट्रॅक्टर घेऊन नायिकेला प्रभावित करण्यासाठी येतो, पहिल्या काही क्षणातच पाण्यातून जाणाऱ्या ट्रॅक्टरने नायिकेला ज्या प्रकारे चिंब भिजवले तो इरसाल रोमँटिकपणा यात सुंदर चित्रीत झाला आहे. गाण्यात ट्रॅक्टर चालवणारी नायिका आणि घोड्यावरुन आलेला तिचा प्रियकर हे दृष्यही अप्रतिम आहे.