मुंबई - Battalion 50 : देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षक नेहानीच पाठिंबा देताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतही या विषयावर चित्रपट बनविल्या जाते. दरम्यान आता अशाच एका शुरवीर सैनिकाची गाथा प्रेक्षकांना ‘बटालियन 50’मधून पाहायला मिळणार आहे. यापूर्वी शूर सैनिकांच्या कहाण्या पडद्यावर आपण पाहिल्या आहेत. आता या चित्रपटामध्ये मराठमोळ्या मातीत शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडतात हे दाखवल्या गेले आहे. या चित्रपटाची कहणी अंगावर काटे उभी करणारी आहे. 'बलोच' या ऐतिहासिक देशप्रेमाची कहाणी सांगणाऱ्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर त्याच 'कीर्ती वराडकर फिल्म्स' निर्मितीसंस्थनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'बटालियन 50'मध्ये शूरवीरांची गाथा : भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक अत्यंत खडतर आयुष्य जगत असतात. ते तिथे असतात म्हणून देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून आपली ड्युटी करताना ते कधीच चुकत नाहीत. त्यांना आपल्या देशवासीयांची काळजी असते. परंतु ज्यांच्यासाठी ते आपल्या प्राणांची बाजी लावतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता कोणी व्यक्त करताना दिसत नाही. 'बटालियन 50' हा चित्रपट याबद्दलची उणीव भरून काढणारा आहे. या चित्रपटातून सैनिकांच्या मानसिकतेवर आणि भावनिकतेवर जोर देण्यात आला असून त्यातून सैनिकविश्व कसे असते याची कल्पना प्रेक्षकांना दिली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केले आहे. भारतीय इतिहासातल्या या शरीरातील रक्त सळसळू लावणाऱ्या शूरवीरांची गाथा जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.