मुंबई -अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन याची मुख्य भूमिका असलेल्या ‘गणपत’ या अॅक्शन पॅक्ड चित्रपटाची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून प्रेक्षक करत आहेत. अखेर या चित्रपटाच्या रिलीज तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत गणपतच्या नवीन रिलीजची तारीख सांगितली. त्यांनी लिहिलंय, 'अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन याची मुख्य भूमिका असलेल्या ‘गणपत’ नवीन रिलीजची तारीख ठरली आहे. हा चित्रपट 5 भाषांमध्ये रिलीज होईल. गणपथ भाग 1 हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.'
टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ या चित्रपटाची नायिका कोण असणार याबद्दल लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. निर्मात्यांनी यापूर्वीच यावरील पडदा दूर करत क्रिती सेनॉनचे नाव घोषीत केले होते. गणपतमध्ये ती जस्सी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. खरंतर टायगर आणि कृती यांनी आपल्या कारकीर्दीला २०१४ मध्ये 'हिरोपंथी' या चित्रपटापासून एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केली होती. दिग्दर्शक विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी एकत्र काम केले आणि यशाचे शिखर गाठले होते. गणपतचे निर्माते जॅकी भगनानी यांनीच हिरोपंथीची निर्मिती केली होती. या चित्रपटाने अॅक्शन चित्रपटाची एक नवी ओळख बॉलिवूडला करुन दिली होती.
गणपत या चित्रपटातील टायगर श्रॉफची भूमिका 'न भूतो न भविष्यति' अशी असल्याचे दिग्दर्शक विकास बहल यांनी यापूर्वी सांगितले होते. आजवर टायगरने साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा या चित्रपटातील त्याची व्यक्तीरेखा नाविन्यपूर्ण असल्याचे खात्री बहल यांनी दिली होती. गणपत या चित्रपटाचे अनेक भाग बनणार असून पहिला भाग यंदाच्या दसऱ्याच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.